ओळख महाभारताची. भाग १२. धनंजय चितळे



भगवान श्रीपरशुराम

महाभारत म्हणजे केवळ घडलेल्या घटनांचे चित्रीकरण नाही. या ग्रंथात संवादातून रामायणादी कथा मांडल्या गेल्या आहेत.

कोकणभूमी निर्माता राजराजेश्वर भगवान श्रीपरशुराम आणि त्यांच्या कुळाचे अनेक उल्लेख महाभारतात येतात. श्रीपरशुरामांचे वडील जमदग्नी ऋषी हे धनुर्विद्येचे मोठे जाणकार होते. एका उन्हाळ्यामध्ये ते धनुर्विद्येचा सराव करीत होते आणि माता रेणुका त्यांनी चालवलेले बाण परत त्यांच्याकडे आणून देण्याचे काम करत होती. त्यावेळी असलेल्या उन्हाच्या कडाक्यामुळे देवी रेणुका थकली. तिला बाण परत आणण्यासाठी थोडा जास्त वेळ लागला. जमदग्नींनी रागावून तिला विचारले, ”तुला उशीर का झाला?” तेव्हा ती म्हणाली, ”उन्हामुळे अंगाला चटके बसतात आणि पायही भाजत आहेत.” भगवान श्री सूर्यनारायणांमुळे आपल्या पत्नीला हा त्रास होतो, असे लक्षात आल्यावर जमदग्नी ऋषींनी सूर्यावरतीच बाण रोखला. तेव्हा प्रकट होऊन श्री सूर्यनारायण म्हणाले, ”ऋषिवर, आपण माझ्यावर अस्त्रप्रयोग करण्यापेक्षा मी देतो त्या दोन वस्तू तुमच्या पत्नीला धारण करायला सांगा.” भगवान सूर्यनारायणांनी त्यावेळी छत्र म्हणजे छत्री आणि उपानह म्हणजेच चप्पल या दोन गोष्टी रेणुकादेवींना दिल्या. थोडक्यात या वस्तूंचा वापर करणारी पृथ्वीवरील पहिली व्यक्ती म्हणजे माता रेणुका होय. याचवेळी भगवान सूर्यनारायणांनी जमदग्नी व रेणुका यांना तुमच्या पोटी श्रीविष्णू अवतार घेतील, असा आशीर्वाद दिला. महाभारताच्या वनपर्वात ही कथा सांगितली आहे.

महाभारतातील तीन महत्त्वाच्या योद्ध्यांना परशुरामांनी विद्यादान केले आहे. भीष्म पितामह आचार्य द्रोण आणि अंगराज कर्ण या त्या तीन व्यक्ती होत. ज्यावेळी द्रोणाचार्य भगवान श्रीपरशुरामांकडे गेले, तेव्हा त्यांनी श्रीपरशुरामांना मला काही दान करावे अशी प्रार्थना केली. श्रीपरशुराम म्हणाले, ”माझ्याकडे जे होते ते मी देऊन टाकले. आता माझ्याकडे फक्त माझे शरीर आणि माझी विद्या आहे. तुला काय हवे ते सांग.” त्यावेळी द्रोणाचार्यांनी मला आपली अस्त्रविद्या द्या, असे सांगितले आणि परशुरामांनी त्यांची इच्छा पूर्ण केली.

महाभारत युद्धामध्ये या तिन्ही महावीरांनी मोठा पराक्रम गाजवला. विशेष म्हणजे हे तिन्ही योद्धे समोरासमोरील लढाईत मारले गेले नाहीत. शिखंडीला पुढे करून अर्जुनाने भीष्मांना परास्त केले. अश्वत्थामा मेला, अशी आवई उठवून द्रोणाचार्यांना युद्धनिवृत्त केले गेले आणि ते शस्त्र खाली ठेवून रथात बसले असता धृष्टद्युम्न त्यांच्या रथावर चढला आणि त्यांचा शिरच्छेद केला. अंगराज कर्णाच्या रथाचे चाक श्रीपरशुरामांनीच दिलेल्या शापामुळे जमिनीत रुतले आणि भगवान श्रीकृष्णांच्या निर्देशाप्रमाणे अर्जुनाने कर्णाचा वध केला.

आपल्याच तोडीचे असे वीर तयार करणारे भगवान श्रीपरशुराम किती श्रेष्ठ गुरु असतील? महाभारताचे युद्ध हे विनाशकारी आहे. ते होऊ नये, म्हणून अनेकांनी दुर्योधनाला समजावण्याचे प्रयत्न केले. श्रीपरशुरामांनीसुद्धा हस्तिनापुरात जाऊन कौरवांना युद्धापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला, असे महाभारत सांगते.

वाचक हो, महाभारत हा ग्रंथ म्हणजे विविध कथांचा, ज्ञानाचा जणू विश्वकोश आहे. त्याचे जितके अध्ययन करू, तितके कमीच आहे. थोर अभ्यासक चक्रवर्ती राजगोपालाचारी असे म्हणतात, ”एखाद्याने सर्व भारतभर प्रवास केला आणि त्यातील सर्व गोष्टींचे अवलोकन केले, तरीदेखील रामायण आणि महाभारत यांचा अभ्यास केल्याशिवाय त्याला भारताचे जीवनरहस्य उमगू शकणार नाही.” असे महाभारत निर्माण करणाऱ्या महर्षी व्यासांना अनेकानेक नमस्कार.
(क्रमशः)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button