
इन्सुली तपासणी नाक्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाने मोठी कारवाई करत गोवा बनावटीचा विदेशी मद्यसाठा जप्त केला
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्र. 66 वरील इन्सुली तपासणी नाक्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाने मोठी कारवाई करत अवैध वाहतूक होत असलेला गोवा बनावटीचा विदेशी मद्यसाठा जप्त केला.या कारवाईत तब्बल 40 लाख 56 हजारांची गोवा दारू व 10 लाखांचा कंटेनर असा 50 लाख 66 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला.राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार 25 डिसेंबर रोजी रात्री 10.30 वा. मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या कंटेनर (क्र. ॠग-17-दद-0871) इन्सुली तपासणी नाक्यावर तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान कंटेनरमध्ये 13 मोठ्या लाकडी पेट्यांमध्ये गोवा बनावटीचा विदेशी मद्यसाठा आढळून आला. यात रॉयल ब्ल्यू माल्ट व्हिस्कीच्या 180 मि.लि. क्षमतेच्या प्रत्येकी 48 सिलबंद बाटल्या असलेल्या एकूण 650 काड्या, म्हणजेच 31,200 बाटल्या सापडल्या. हा मद्यसाठा महाराष्ट्रात अवैधरीत्या वाहतूक केला जात असल्याचे स्पष्ट झाले.
याप्रकरणी वाहनचालक यशेश कुमार राजेंद्रकुमार शुक्ला (50, रा. वारसिया, वडोदरा, गुजरात) याला ताब्यात घेण्यात आले आहे. जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालात 40.56 लाख रुपये किमतीचा मद्यसाठा, 10 लाख रुपये किमतीचे कंटेनर तसेच 10 हजार रुपये किमतीचा अँड्रॉईड मोबाईल यांचा समावेश असून, एकूण मुद्देमालाची किंमत 50.66 लाख रुपये आहे. याप्रकरणी महाराष्ट्र दारूबंदी कायदा 1949 अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.




