
अशोक समेळ यांच्या ‘द्रौपदी : काल, आज, उद्या’ या महाकादंबरीचं दिमाखात प्रकाशन सोहळा
मुंबई
‘द्रौपदी दीपशिखा होती, याज्ञसेनी होती, अत्यंत बुध्दिमान होती, हजरजबाबी होती, तेजस्विनी होती तशीच विवेकी होती’, अशी द्रौपदीची गुणवैशिष्ट्ये सांगतानाच त्यांनी द्रौपदीच्या पाचही मुलांना अश्वत्थाम्यानं अत्यंत क्रूरतेनं आणि अधर्मानं मारल्यावर त्याला तिच्यासमोर आणलं असताना आणि अश्वत्थाम्याला ठार करण्यासाठी तिची अनुमती मागितली असताना ती म्हणते,’नको. त्याला मारू नका.’ यामागची द्रौपदीची विवेकबुध्दी स्पष्ट करताना प्रमुख वक्त्या प्रा. मेधा सोमण म्हणाल्या,’कृपीला पतीवियोगाचं दुःख आहे. अश्वत्थाम्याला ठार केलं तर तिला पुत्र वियोगाचं दुःख सहन होणार नाही. पुत्र वियोगाचं दुःख काय असतं, ते मी अनुभवतेय. ज्या द्रौपदीच्या पाचही मुलांना ठार मारलं हे कळलं आहे, ती आपला विवेक ढळू देत नाही. द्रौपदीचा मातृत्व आणि विवेकाचा हा गुण अनन्यसाधारण आहे.’ त्या पुढे म्हणाल्या, ‘द्रौपदीला एकाच दुर्योधनाकडून, एकाच दुःशासनाकडून अत्याचार सहन करावा लागला. आजच्या द्रौपदीला अनेक दुर्योधन, दुःशासनांशी सामना, संघर्ष करावा लागतोय. द्रौपदीला जे एक कृष्णतत्व मिळालं, तसं आज अनेकांमधून कृष्णतत्व मिळायला हवं.’
अध्यक्षपदावरून बोलताना खगोलशास्त्रज्ञ दा. कृ. सोमण म्हणाले, ‘आज मी सगळ्या नक्षत्र, ताऱ्यांना घेऊन आलोय. त्यांच्या महकादंबर्या मी वाचल्या आहेत. त्यांच्या कादंबऱ्यांच्या दहाच काय शंभर आवृत्या निघोत आणि त्या मागच्या पिढीपासून पुढच्या पिढ्यांपर्यंत पोहोचायला हवं. अशा लेखकाला सरकारनं एका खोलीत बंदिस्त करून, त्याला संदर्भ ग्रंथ पुरवून त्यांच्याकडून अशा शंभर महाकादंब-या लिहून घ्याव्यात.’
अशोक समेळ यांनी द्रौपदीच्या गुणवैशिष्ट्यांसह आजच्या आणि उद्याच्याही द्रौपदींचा धांडोळा या महाकादंबरीतून घेतला आहे. त्यांना किरण वालावलकर आणि स्मिता गवाणकर यांनी मुलाखतीतून बोलतं केलं.
तत्पूर्वी ‘डिंपल पब्लिकेशन’च्या अशोक मुळे यांनी प्रकाशकाचं मनोगत व्यक्त करताना अशोक समेळ यांची ‘अश्वत्थाम्या’वरील महाकादंबरी त्यांच्याकडे कशी आली, त्याचा किस्सा सांगितला. त्यांच्या प्रकाशन संस्थेला पन्नास वर्षं झाल्याबद्दल आणि ‘अखिल मराठी प्रकाशन संस्थे’कडून ‘जीवनगौरव पुरस्कार’ प्राप्त झाल्याबद्दल त्यांचा अशोक समेळ यांनी विशेष भेटवस्तू देऊन सन्मान केला.
संग्राम समेळ आणि सौ. संजीवनी समेळ यांनी ‘द्रौपदी’ या महाकादंबरीतील काही भागांचं अभिवाचन अप्रतिमपणे सादर केलं, त्याला उपस्थितांनी उत्स्फूर्त दाद दिली.
या कार्यक्रमाचं अत्यंत खुशखुशीत, प्रभावी सूत्रसंचालन स्मिता गवाणकर यांनी केलं तर आनंदयात्रींतर्फे अरूण घाडीगावकर यांनी आभार व्यक्त केले.



