
ना. उदय सामंत – उद्योग, संस्कृती आणि मराठी अस्मितेचे नेतृत्व
महाराष्ट्राच्या औद्योगिक प्रगतीला गती देताना आणि मराठी भाषेच्या अस्मितेला सशक्त करताना समतोल राखणारे नेतृत्व म्हणून ना. उदय सामंत यांचे कार्य उल्लेखनीय ठरते. उद्योग मंत्री तसेच मराठी भाषा मंत्री या दुहेरी जबाबदाऱ्या समर्थपणे सांभाळताना,त्यांनी घेतलेले निर्णय हे राज्याच्या आर्थिक, सांस्कृतिक व भाषिक विकासासाठी दिशादर्शक ठरले आहेत.
ना उदय सामंत उद्योग आणि मराठी भाषा या दोन्ही विभागासाठी महाराष्ट्रभर सतत दौरे करत असतात. उद्योजकांचे प्रश्न सोडवण्यासाठी राज्यभरातील विविध उद्योजक संघटनांबरोबर त्यांचा सतत संवाद असतो. उद्योग परिषदा, उद्योग संमेलने आणि चर्चा सत्र यामधील त्यांचा सहभाग उद्योजकांना आश्वासित करीत असतो.
मराठी भाषेच्या बाबतीत बोलायचे झाल्यास साहित्य आणि संस्कृती संदर्भात असणारे विविध कार्यक्रम जसे की साहित्य संमेलन, अभिजात मराठी भाषा गौरव सोहळा,चर्चासत्र,परिसंवाद, जिल्हा संमेलन अशा विविध उपक्रमात त्यांची उपस्थिती साहित्यिक आणि वाचकांना प्रोत्साहित करीत असते. उद्योग व मराठी भाषा विभागाच्या माध्यमातून राज्यभर राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांमुळे ना. उदय सामंत यांचा सातत्यपूर्ण दौरे सुरू असतात.
प्रशासन, समाज आणि लोकभावनांशी थेट संपर्क साधत त्यांनी नेतृत्वाची वेगळी ओळख निर्माण केली आहे.मोर्चे, उपोषण, आंदोलन किंवा संवेदनशील प्रश्नांच्या वेळी संकटमोचक भूमिका निभावणारे नेतृत्व म्हणून त्यांची ओळख अधिक दृढ होत आहे.
उद्योग विभाग : गुंतवणूक, रोजगार आणि भविष्याची पायाभरणी
महाराष्ट्राला देशातील आघाडीचे व जागतिक स्तरावर स्पर्धात्मक औद्योगिक राज्य बनवण्यासाठी उद्योग विभागामार्फत निर्यातवाढ, गुंतवणूक आकर्षण आणि रोजगारनिर्मिती या तीन प्रमुख उद्दिष्टांवर आधारित धोरणात्मक निर्णय घेतले जात आहेत. या निर्णयांमुळे राज्याचा दीर्घकालीन औद्योगिक विकास अधिक गतिमान होत आहे.
उद्योगमंत्री ना. उदय सामंत यांच्या निर्णयानुसार राज्यात १२ नवीन औद्योगिक धोरणे अमलात आणण्यात आली आहेत. हा निर्णय महाराष्ट्राच्या औद्योगिक वाटचालीतील महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.या धोरणांतर्गत AVGC,(Animation, Visual Effects, Gaming and Comics) ग्लोबल कॅपॅबिलिटी सेंटर्स, इलेक्ट्रॉनिक्स, एरोस्पेस, बॅम्बू-आधारित उद्योग, MSME, लॉजिस्टिक्स व निर्यातकेंद्रित क्षेत्रांना विशेष प्राधान्य देण्यात आले आहे. २०५० पर्यंत एव्हीजीसी क्षेत्रात ३२६८ कोटींची गुंतवणूक, तंत्रज्ञानाधारित उद्योगांचा विस्तार आणि सुमारे ५० लाख रोजगारनिर्मितीचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे.महाराष्ट्राने बांबू उद्योग व रत्ने–दागिने धोरण २०२५ जाहीर करून बांबू क्षेत्रात ₹५०,००० कोटी गुंतवणूक व ५ लाख रोजगार, तर रत्ने-दागिने क्षेत्रात ₹१ लाख कोटी गुंतवणूक व ५ लाख रोजगारनिर्मितीचे उद्दिष्ट ठरविले आहे.
रत्नागिरीत उभारली जाणारी जगातील सर्वात मोठी डिफेन्स सिटी ही जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब ठरणार असून, देशाच्या सुरक्षेसाठी आवश्यक असलेली अत्याधुनिक शस्त्रसामग्रीची याच ठिकाणी निर्मिती होणार आहे. या प्रकल्पामुळे सुमारे ८,००० नवीन रोजगार उपलब्ध होणार आहेत. यासोबतच प्रस्तावित सेमिकंडक्टर प्रकल्पातून आणखी २०,००० रोजगारांची निर्मिती होणार आहे, रत्नागिरी औद्योगिक आणि तांत्रिकदृष्ट्या देशाच्या नकाशावर महत्त्वाचे केंद्र म्हणून उदयास येणार आहे.
औद्योगिक विकासाला गती देण्यासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचा (MIDC) विस्तार, नियोजित औद्योगिक भूखंड निर्मिती, औद्योगिक क्लस्टर्सची उभारणी आणि गुंतवणूकदारांसाठी सुलभ व पारदर्शक प्रक्रिया राबविण्यावर भर देण्यात आला आहे.
या निर्णयामुळे महाराष्ट्राची औद्योगिक ताकद वाढून राज्य देशांतर्गत तसेच जागतिक गुंतवणूकदारांसाठी आकर्षक औद्योगिक केंद्र म्हणून पुढे येत आहे.सन २०२४–२५ या कालावधीत सुमारे १ लाख ६४ हजार ८७५ कोटी रुपयांची परकीय गुंतवणूक राज्यात आली आहे.
मराठी भाषेच्या सन्मान आणि संवर्धनासाठी कटिबद्ध नेतृत्व
आजच्या दिवशी मराठी भाषा आणि संस्कृतीसाठी केलेल्या कामाची आठवण घेणे महत्त्वाचे आहे. उद्योग व मराठी भाषा विभागाचे मंत्री ना. उदय सामंत सातत्याने मराठी शिक्षण, साहित्य आणि प्रचाराला चालना देत आहेत.
मराठी भाषा ही केवळ संवादाचे माध्यम नसून ती महाराष्ट्राची सांस्कृतिक ओळख, इतिहास आणि अस्मिता आहे. या अस्मितेचे संवर्धन, आधुनिकीकरण आणि जागतिक स्तरावर प्रसार करण्यासाठी मराठी भाषा विभागामार्फत ना. उदय सामंत यांनी महत्त्वपूर्ण पुढाकार घेतला आहे, जो मराठी भाषेच्या वाटचालीतील मैलाचे दगड ठरत आहेत.
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी ना. उदय सामंत यांनी तब्बल अकरा वर्षांपूर्वी, मराठी भाषेचे राज्यमंत्री असताना, केंद्र शासनाकडे अधिकृत प्रस्ताव सादर केला होता. विशेष म्हणजे, मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देणारी अधिसूचना जेव्हा निर्गमित झाली, तेव्हा तेच मराठी भाषा विभागाचे कॅबिनेट मंत्री होते.
राज्यमंत्री म्हणून प्रस्ताव मांडणारे आणि कॅबिनेट मंत्री म्हणून त्या ऐतिहासिक निर्णयाच्या अंमलबजावणीचे साक्षीदार ठरण्याचा हा दुर्मीळ आणि गौरवपूर्ण योग त्यांच्या वाट्याला आला.
मराठी भाषेला संस्थात्मक बळ देण्यासाठी मुंबईत सुमारे १०० कोटी रुपयांचे भव्य मराठी भाषा केंद्र उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासोबतच ऐरोली येथे उपकेंद्र स्थापन करून संशोधन, प्रशिक्षण व आधुनिक भाषाविकासासाठी आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत.
मराठीचा जागतिक स्तरावर प्रसार व्हावा या उद्देशाने लंडन येथे ‘छत्रपती शिवाजी महाराज वैश्विक मराठी भाषा केंद्र’ उभारण्यासाठी ५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून, ही मराठी भाषेच्या आंतरराष्ट्रीय वाटचालीतील एक महत्त्वपूर्ण व ऐतिहासिक पायरी ठरली आहे.
मराठी भाषेच्या प्रसारासाठी ‘मराठी शिकण्याचे अॅप’ सुरु झाले असून दरवर्षी किमान ५,००० अमराठी नागरिकांना मराठी शिकण्याची संधी मिळत आहे. यशवंतराव चव्हाण अनुवाद समिती स्थापन करून मराठी साहित्याचा जागतिक स्तरावर प्रसार सुनिश्चित केला जात आहे.
आळंदी देवस्थानातून ज्ञानेश्वरी अत्यल्प दरात जनतेपर्यंत पोहोचत आहे, तर तुकाराम महाराजांच्या गाथेचे ई-बुक देश-विदेशातील वाचकांपर्यंत पोहोचत आहेत. मराठीच्या जागतिक प्रसारासाठी ७५ मराठी मंडळे स्थापन होणार आहेत. काश्मीरमध्ये मराठी पुस्तकांचे गाव तयार होत असून परदेशात शाळांची संख्या वाढवून एकूण ७४ शाळा करण्यात येणार आहेत.
जवाहरलाल नेहरू विद्यापीठा मध्ये छत्रपती शिवाजी महाराज अभ्यासक्रम आणि कुसुमाग्रज अध्यासन केंद्र सुरू केल्याने मराठी भाषा व साहित्याचा शैक्षणिक आणि सांस्कृतिक प्रसार अधिक व्यापक झाला आहे.
मराठी साहित्य आणि सांस्कृतिक चळवळीला चालना देण्यासाठी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, विविध परिसंवाद व साहित्यिक उपक्रमांना सक्रिय पाठबळ देण्यात येत आहे.
मराठी भाषा व साहित्याच्या संवर्धनासाठी ‘कवितांचे गाव’ ही अभिनव संकल्पना महाराष्ट्रात साकारली जात होती. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला तालुक्यातील उभादांडा हे भारतातील पहिले ‘कवितांचे गाव’ होते. याच धर्तीवर नाशिकजवळील शिरवाडे–वणी (कवी कुसुमाग्रज यांचे गाव) आणि अंबाजोगाई (आद्यकवी मुकुंदराज यांचे गाव) ही गावे देखील ‘कवितांची गावे’ म्हणून विकसित करण्यासाठी ना. उदय सामंत यांनी महत्त्वपूर्ण पुढाकार घेतला आहे. या उपक्रमांमुळे मराठी भाषेच्या संवर्धनाला आणि प्रसाराला नवी दिशा मिळत आहे.
रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून ना. उदय सामंत यांनी रत्नागिरी खेड आणि चिपळूण येथील नाट्यगृहांच्या पुनर्स्थापनेसाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. जिल्ह्यात नाट्य आणि सांस्कृतिक विकासाला चालना देण्यासाठी पुरेसा निधी उपलब्ध करून दिला. खेड नाट्यगृहासाठी १३ कोटी रुपये, रत्नागिरीतील वि.दा. सावरकर नाट्यगृहासाठी १५ कोटी आणि चिपळूणमधील इंदिरा गांधी केंद्रासाठी १५ कोटी रुपये निधी दिल्याने जिल्ह्यातील बंद असलेली ही नाट्यगृहे पुन्हा सुरू होऊन सांस्कृतिक चळवलीला नवी गती मिळाली आहे.
ना. उदय सामंत यांनी मराठी भाषेच्या जतन, संवर्धन आणि वृद्धीसाठी केलेले कार्य हे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशाचे भक्कम आधार आहेत.
या वाढदिवसानिमित्त, त्यांच्या या प्रेरणादायी पुढाकारांना शुभेच्छा देत, मराठी भाषेच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांना कायम यश लाभो हीच प्रार्थना.
डॉ प्रशांत पटवर्धन
(लेखक फेडरेशन ऑफ रत्नागिरी डिस्ट्रिक्ट चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीचे अध्यक्ष आहेत)




