
खेड येथील भरणे जगबुडी पूल परिसरात कचर्याच्या दुर्गंधीमुळे पादचार्यांसह वाहनचालक हैराण
अपघातांच्यादृष्टीने शापित बनलेला भरराणे येथील जगबुडी पूल नव्या कारणाने चर्चेत आला आहे. भरणे ग्रामपंचायतीकडून जुन्या पुलाखाली मोकळ्या जागी कचर्याच्या विल्हेवाटीचे सोपस्कार पार पाडले जात आहेत. प्रसंगी कचराही जाळला जात आहे. धुमसणार्या कचर्यासह दुर्गंधीमुळे वाहनचालकांसह पादचार्यांना नाक मुठीत धरुनच मार्गक्रमण करावे लागत आहे.
भरणे ग्रामपंचयायतीकडे कचर्याच्या विल्हेवाटीसाठी अजूनही हक्काची जागा पदरात पडलेली नाही. यामुळे भरणे येथील जुन्या जगबुडी पुलाखालील मोकळ्या जागेत कचर्याची विल्हेवाट लावण्याची वेळ ग्रामपंचायतीवर ओढवली आहे. प्रसंगी अनेकवेळा कचरा जाळलाही जात आहे. यामुळे हा पूल पूर्णतः दुर्गंधीच्या फेर्यात अडकला आहे. धुमसणार्या कचर्यामुळे पादचार्यांसह वाहनचालक जेरीस आले आहेत.
याप्रश्नी राजकीय पक्षांसह सामाजिक कार्यकर्त्यांनी ’हाताची घडी अन् तोंडावर बोट’ ठेवण्यात धन्यता मानली आहे. आधीच अपघाताच्या दृष्टीने शापित बनलेला जगबुडी पूल कचर्याच्या विळख्यात अडकून त्याचा त्रास वाहनचालकांसह पादचार्यांना सहन करावा लागत असतानाही याप्रश्नी कोणीच आवाज उठवत नसल्याने ग्रामपंचायतीचेही फावत आहे. याचमुळे जुन्या जगबुडी पुलाखालील परिसरातील दुर्गंधीचा फेरा कायम आहे. या गंभीर बाबीची दखल घेणार तरी कोण, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.www.konkantoday.com




