
समोरच्यांनीच आम्हाला महायुतीत यायचे नाही, असं सांगितलंय…आमचं कुठं निमंत्रण आहे चिपळूण मध्ये पालकमंत्री उदय सामंत यांचा राष्ट्रवादीला टोला
आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत काय चर्चा करायची ही जबाबदारी माझ्यावर सोडा. तुम्ही स्थानिक नेते एकत्र बसा आणि आगामी निवडणुकीत हाच पॅटर्न राबवू. आता समोरच्यांनीच आम्हाला महायुतीत यायचे नाही, असं सांगितलंय…आमचं कुठं निमंत्रण आहे या म्हणून, असे खळबळजनक विधान जिल्ह्याचे पालकमंत्री व उद्योगमंत्री उदय सामंत यांनी चिपळूण येथे चिपळूण व गुहागरमध्ये विजयी झालेल्या युतीच्या नगरसेवकांच्या सत्कार सोहळ्यात केले आणि त्यांनी थेट अजित पवार राष्ट्रवादीला इशारा दिला.शहरातील अतिथी सभागृहात (दि.22) दुपारी हा सत्कार सोहळा झाला. यावेळी व्यासपीठावर फलोत्पादन मंत्री भरत गोगावले, भाजपा नेते प्रशांत यादव, शिवसेना उपनेते सदानंद चव्हाण, जिल्हाप्रमुख शशिकांत चव्हाण, विपुल कदम, नगराध्यक्ष उमेश सकपाळ, रत्नागिरीचे राहूल पंडीत, राजेश बेंडल, गुहागरच्या नगराध्यक्षा निता मालप, चिपळूण व गुहागरचे सर्व नगरसेवक व पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी ना. सामंत यांच्या हस्ते नवनिर्वाचित नगराध्यक्ष व नगरसेवकांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी बोलताना पालकमंत्री सामंत म्हणाले, आम्हाला फसवलं हे सगळ्यांना सांगणे हे किती खोटारडेपणाचे लक्षण आहे हे आज सर्वांनी ओळखले पाहिजे. ज्यांनी रत्नागिरीमध्ये राष्ट्रवादीच्या उमेदवारांना एबी फॉर्म दिले, त्यांनी आम्हाला फसविले म्हणणे खरे आहे का? संपूर्ण निवडणुकीत आपण टीका केली नाही. केवळ विकासाच्या अजेंड्यावर निवडणूक लढविली आणि लोकांनी आज आपल्यावर विश्वास ठेवून विजयी केले. आता उमेश सकपाळ यांची जबाबदारी वाढली आहे. भविष्यातील पाच वर्षांत चांगले काम करावे. तुम्ही चांगले काम केले नाही तर पुढे लोकं तुम्हाला निवडून देणार नाहीत याचे भान ठेवावे. याची जबाबदारी नगराध्यक्ष आणि नगरसेवकांनी घ्यावी, असे सुनावले. आगामी निवडणूक संदर्भात बोलताना ते म्हणाले, युती करायची की नाही ही जबाबदारी माझ्यावर सोडा. समोरच्यांनी आम्हाला युतीत यायचे नाही हे आधीच सांगितले आहे. आम्ही महायुती जपण्याचा प्रयत्न करीत आहोत. आम्ही देवेंद्रजींना जेवढा सन्मान देतो, तेवढाच एकनाथ शिंदे यांना, आणि तेवढाच अजित पवार यांना देतो. त्यामुळे आमची दारं खुली होती. स्वतःहून जर ती कुणी बंद केली असतील तर स्वतःहून ती उघडण्याचा प्रयत्न कुणी करू नये असे आज जिल्हाप्रमुखांना सांगतो. त्यांना जर आपल्याबरोबर यायचे नाही तर आपण त्यांच्याबरोबर का जायचे? असा सवालही उपस्थित केला. अशा युतीमध्ये आपल्या कार्यकर्त्यांचे नुकसान होते. अंकूश आवले किंवा निहारसारखा कार्यकर्ता भरडला असता, असे बोलून दाखविले.




