
लक्ष्मी ऑरगॅनिक इंडस्ट्रीज लिमिटेड या कंपनीबाबतजिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे व कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत महत्त्वाची आढावा बैठक
खेड तालुक्यातील लोटे एमआयडीसीमध्ये कार्यरत असलेल्या लक्ष्मी ऑरगॅनिक इंडस्ट्रीज लिमिटेड या कंपनीबाबत सध्या सोशल मीडियावर प्रसारित होत असलेल्या विविध पोस्ट आणि व्हिडिओंच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी पोलीस दलाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने खबरदारी म्हणून जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत नुकतीच एक महत्त्वाची आढावा बैठक घेतली.
सध्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर कंपनीसंदर्भात व्हायरल होत असलेल्या माहितीमुळे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांनी कंपनीबाबत प्राथमिक माहिती संकलित केली आहे. या विषयाचे गांभीर्य ओळखून २३ डिसेंबर २०२५ रोजी पोलीस अधीक्षक कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या या बैठकीला स्वतः पोलीस अधीक्षक नितीन बगाटे आणि लक्ष्मी ऑरगॅनिकचे प्लांट हेड दीपक पाटील उपस्थित होते. या बैठकीत सोशल मीडियावर व्यक्त होत असलेल्या चिंता, कंपनीचे कायदेशीर कामकाज, वैधानिक परवानग्यांचे पालन आणि जनतेशी पारदर्शक संवादाचे महत्त्व यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
यावेळी पोलीस प्रशासनाकडून कंपनीच्या प्रतिनिधींना कडक सूचना देण्यात आल्या आहेत. कंपनीने सर्व लागू कायदे, पर्यावरणीय नियम आणि सक्षम अधिकाऱ्यांनी जारी केलेल्या निर्देशांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आदेश पोलीस अधीक्षकांनी दिले आहेत. दरम्यान, या प्रकरणाबाबत नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन रत्नागिरी पोलीस दलातर्फे करण्यात आले आहे. सोशल मीडियावरील अस्पष्ट माहितीची खातरजमा केल्याशिवाय ती प्रसारित करू नये आणि कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी शासकीय यंत्रणांना सहकार्य करावे, असे आवाहनही पोलिसांकडून करण्यात आले आहे.



