
रत्नागिरी जिल्हा परिषद सावित्री महिला ग्राम संघाकडे पाणी योजनेची दोरी
रत्नागिरी : जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत लांजा तालुक्यातील ग्रामपंचायत वळके महसूल गाव मराठवाडी या गावात राबविलेल्या “हर घर जल” एक अभिनव उपक्रमाच्या उद्देशाने ही योजना सावित्री महिला ग्राम संघाकडे संचालन देखभाल व दुरुस्तीसाठी देण्याबाबतचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार २२ डिसेंबर रोजी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती वैदेही रानडे यांनी प्रत्यक्षात योजनेच्या संचालन देखभाल दुरुस्तीची पाहणी केल्यानंतरच ही योजना ग्रामसंघाकडे हस्तांतरित केली असून त्याबाबतचा करार करण्यात आला.
वळके महसूल गाव मराठवाडी हे गाव नेहमीच शासनाच्या विविध उपक्रमांमध्ये भाग घेत असते. २०२० रोजी जल जीवन कार्यक्रमांतर्गत घोषणा झाल्यानंतर या गावाने त्याच्यामध्ये सहभाग होण्याचा निर्णय घेतला सहभाग घेतल्यानंतर गावातील काही दानशूर लोकांनी योजनेच्या विविध उपांगासाठी (विहीर व पंप घर) जमीन ग्रामपंचायतीकडे हस्तांतरण केली. एकूण ७९ कुटुंब संख्या असलेल्या या गावांमध्ये सर्वांच्याकडे नळजोडणी असून, गावातील ८० टक्के कुटुंबाकडे जलमापक आहेत, तर उर्वरित प्रगतीपथावर आहेत.
२५ ऑगस्ट रोजी गाव “हर घर जल” घोषित झाल्यानंतर गावातील पाणीपुरवठा व स्वच्छता समितीने एक अभिनव उपक्रमाच्या उद्देशाने ग्रामसंघाकडे योजना संचालन देखभाल व दुरुस्तीसाठी देण्याबाबतचा निर्णय घेतला. त्यासाठी संबंधित सावित्री महिला ग्राम संघाने याला होकार दिला. या ग्राम संघामध्ये एकूण १४ स्वयंसहायता बचत गट असून १७३ महिला सहभागी आहेत. या ग्राम संघाला त्यांच्या दैनंदिन कामासाठी व पाणीपुरवठा योजनेच्या पाणीपट्टी वसुली करण्याच्या कामी मदत व्हावी यासाठी स्वतंत्र कार्यालय ग्रामपंचायतीने उपलब्ध करून दिलेले आहे. स्वतः महिला योजनेची सर्व देखभाल दुरुस्ती करत असतात तसेच पाणीपट्टी वसुली करत असतात.
ही योजना हस्तांतरणाच्या वेळी प्रकल्प संचालक सागर पाटील, कार्यकारी अभियंता मयुरी पाटील, महिला बालकल्याणचे कार्यक्रमाधिकारी श्री. कांबळे, पंचायत समितीचे माजी सभापती तथा विद्यमान सरपंच उत्तम सावंत, ग्रामपंचायत अधिकारी संजय दळवी, सावित्री महिला ग्राम संघाच्या अध्यक्ष श्रीमती घुमा यांच्यासह सर्व ग्रामस्थ व महिला उपस्थित होत्या.



