
महिला पोलीसांना जीवनाकडे सकारात्मकतेने बघण्याचा दृष्टीकोन शिकविणारी कार्यशाळा- पोलीस अधिक्षक नितीन बगाटे
रत्नागिरी, दि. 24 ):- महिला आपला संसार, नोकरी, मुलांचे संगोपन या सर्व जबाबदाऱ्या पार पाडण्यामध्ये नेहमीच व्यस्त असतात. यातून त्यांना स्वत:ला वेळ देणे अनेकदा शक्य होत नाही. यातूनच मानसिक ताण निर्माण होतो. आजची ही कार्यशाळा उपस्थित सर्व महिला पोलीसांना जीवनाकडे सकारात्मकतेने बघण्याचा दृष्टीकोन शिकविणारी आहे, असे प्रतिपादन जिल्हा पोलीस अधिक्षक नितीन बगाटे यांनी केले.

महिला पोलीसांकरिता ताणतणावाचे नियोजन आणि जीवन कौशल्य या विषयी कार्यशाळा आज जिल्हा नियोजन सभागृहात आयोजित करण्यात आली होती त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पोलीस उप अधिक्षक राधिका फडके व या कार्यशाळेच्या मार्गदर्शक डॉ. अरुंधती भालेराव उपस्थित होत्या.

पोलीस विभागात काम करत असताना अनेकदा नकारात्मक घटना पहायला, ऐकायला मिळत आसतात. अशा प्रसंगातूनदेखील नकारात्मकता बाजूला ठेवून पोलीसांनी काम करावे, असे श्री. बगाटे यांनी सांगितले. पोलीस स्थानकात येणारी व्यक्ती त्रासलेली असते. पण, त्या व्यक्तीला चांगली वागणूक देणे ही संबंधित पोलीसांची जबाबदारी आहे.

पोलीसांचे जीवन हे धकाधकीचे आहे. महिला पोलीसांना आपले कुटूंब व कर्तव्य सांभाळताना स्वत:चे मानसिक स्वास्थ्य टिकविणे गरजेचे असते. आनंद सोहळा व विविध गेम्सच्या माध्यमातून महिलांना ताणतणावाचे नियोजन जीवनात उपयोगी ठरणारे आहे, असे डॉ. भालेराव यांनी सांगितले.
कार्यशाळेला महिला पोलीस मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.



