
दापोलीतील वराडकर–बेलोसे महाविद्यालयात शिशिर युवा महोत्सवाचा जल्लोष
दापोली : आर. व्ही. बेलोसे एज्युकेशन फाऊंडेशनच्या न. का. वराडकर कला आणि रा. वि. बेलोसे वाणिज्य महाविद्यालय येथे सुरू झालेल्या शिशिर युवा महोत्सव २०२५–२६ आणि वार्षिक सामाजिक संमेलनाला विद्यार्थ्यांसह पालक व मान्यवरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित हा महोत्सव दापोली येथील रसिकरंजन नाट्यगृह येथे मोठ्या जल्लोषात पार पडला.
महाविद्यालयाच्या कनिष्ठ व वरिष्ठ सांस्कृतिक विभागातर्फे आयोजित स्नेह संमेलनाचे उद्घाटन २३ डिसेंबर रोजी झाले. प्राचार्य डॉ. बी. डी. कऱ्हाड यांनी दिलेल्या निमंत्रणानुसार सर्व प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वेळेवर उपस्थित राहिले. कर्मचारी, विद्यार्थी व पालकांची नाट्यगृहात वेळेवर उपस्थिती कार्यक्रमाच्या शिस्तबद्धतेचे दर्शन घडविणारी ठरली.
उद्घाटन समारंभासाठी प्रमुख अतिथी म्हणून दापोली नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा सौ. कृपा घाग उपस्थित होत्या, तर कर्दे ग्रामपंचायतीचे सरपंच, प्रसिद्ध हॉटेल व्यावसायिक व स्थानिक राजकारणी सचिन तोडणकर हे मान्यवर पाहुणे म्हणून उपस्थित होते.
यावेळी संस्था पदाधिकारी श्रीमती जानकी बेलोसे, श्रीमती मीनाकुमार रेडीज, विलास शिगवण, अनंत सणस, विश्वंभर कमळकर, महादेव गुंजाळ, जनार्दन दाभीळकर आदी मान्यवर उपस्थित होते. फाऊंडेशनचे सह-कार्यवाह अनंत सणस, प्राचार्य, प्राध्यापकवर्ग व स्थानिक मान्यवरांच्या उपस्थितीत दीपप्रज्वलन करून महोत्सवाचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले.
यावेळी सौ. कृपा घाग यांनी विद्यार्थ्यांनी केवळ परीक्षांपुरते मर्यादित न राहता सांस्कृतिक, क्रीडा व सामाजिक क्षेत्रांतही सक्रिय व्हावे, असे आवाहन केले. “अशा व्यासपीठांमुळे नेतृत्वगुण, आत्मविश्वास आणि सामाजिक जाणीव विकसित होते,” असे सांगत त्यांनी आयोजनाबद्दल संस्थेचे कौतुक केले.
सचिन तोडणकर यांनी ग्रामीण व निमशहरी भागातील विद्यार्थ्यांसाठी हे संधीचे व्यासपीठ आयुष्याला दिशा देणारे ठरते, असे सांगून विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे एकूण संयोजन कैलास उजाळ, रिया वैद्य, प्रा. उत्तम पाटील व प्रा. लक्ष्मीकांत पाटील करत असून, त्यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व स्पर्धा व सादरीकरणे सुरळीत पार पडत आहेत. मागील काही आठवड्यांपासून निवड फेऱ्या, सराव सत्रे, नेपथ्य व ध्वनीव्यवस्थेची तयारी सुरू होती.
शिशिर युवा महोत्सवांतर्गत दिवसभर “विविध गुणदर्शन” स्वरूपात नृत्य, नाटिका, लघुनाट्य, एकांकिका, समूहगायन, वाद्यवृंद, वक्तृत्व, विनोदी फटके, फॅशन शो आदी सादरीकरणे रंगत आहेत. कनिष्ठ व वरिष्ठ विभागातील विद्यार्थ्यांच्या सादरीकरणांना प्रेक्षकांकडून भरभरून दाद मिळत आहे. पर्यावरण संरक्षण, स्वच्छता, सायबर गुन्हे, महिलांविरुद्ध अत्याचार, व्यसनमुक्ती, संविधानिक मूल्ये आणि शेतकरी प्रश्न अशा सामाजिक विषयांवर प्रभावी भाष्य करण्यात आले.
विद्यार्थ्यांनी लेखन, दिग्दर्शन, नेपथ्य व नृत्यदिग्दर्शनाची जबाबदारी स्वतः सांभाळल्याने त्यांची कल्पकता ठळकपणे जाणवली. पोशाखातील विविधता, अभिव्यक्ती आणि विनोदनिर्मितीमुळे सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला; काही सादरीकरणांना “वन्स मोर”च्या आरोळ्याही मिळाल्या.
महोत्सव शिस्तबद्ध पार पडावा, यासाठी प्रशासनाने स्पष्ट सूचना जारी केल्या आहेत. चालू शैक्षणिक वर्षातील विद्यार्थ्यांनाच प्रवेश असून ओळखपत्र अनिवार्य आहे. फोटो/व्हिडिओ शूटिंगचा अधिकार केवळ नियुक्त कर्मचाऱ्यांकडे असून नियमभंग झाल्यास कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. धूम्रपान व मद्यपानास कायद्याने बंदी असून नियमभंग झाल्यास कारवाई करण्यात येणार आहे. वाहन पार्किंग सार्वजनिक वाहतुकीस अडथळा ठरणार नाही, याचीही विनंती करण्यात आली आहे.
प्राचार्य डॉ. बी. डी. कऱ्हाड यांनी, “शैक्षणिक प्रगतीसोबत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकासासाठी सांस्कृतिक कार्यक्रम अत्यावश्यक आहेत. शिशिर युवा महोत्सव हा विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व्यासपीठ देणारा उपक्रम आहे,” असे मत व्यक्त केले. प्रा. एफ. के. मगदूम यांनी महाविद्यालयाच्या वतीने सर्व मान्यवर, माजी विद्यार्थी व प्राध्यापकांचे आभार मानले.




