
गणपतीपुळे येथे वीजपुरवठा नियमित, सुरळीत व अखंडित ठेवण्याबाबत तातडीने आवश्यक कार्यवाही करावीरत्नागिरी दक्षिण विभागाचे जिल्हा चिटणीस राजू भाटलेकर यांची मंत्री श्रीमती मेघनाताई बोर्डीकर यांचेकडे मागणी
रत्नागिरी तालुक्यातील श्री क्षेत्र गणपतीपुळे येथे वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने येथील पर्यटन व्यवसायावर परिणाम होत असून, गणपतीपुळे येथे वीजपुरवठा नियमित, सुरळीत व अखंडित ठेवण्याबाबत तातडीने आवश्यक कार्यवाही करावी, अशी मागणी भारतीय जनता पार्टी, रत्नागिरी दक्षिण विभागाचे जिल्हा चिटणीस राजू भाटलेकर यांनी राज्याच्या ऊर्जा खात्याच्या राज्यमंत्री ना. श्रीमती मेघनाताई बोर्डीकर यांचेकडे निवेदनाद्वारे केली आहे.
भाटलेकर यांनी याबाबत निवेदन दिले असून या निवेदनात असे नमूद करण्यात आहे की, गणपतीपुळे, जिल्हा रत्नागिरी येथे दरवर्षी सुमारे २५ ते ३० लाख पर्यटक भेट देत असतात. श्रीक्षेत्र गणपतीपुळे हे जागतिक दर्जाचे पर्यटन क्षेत्र म्हणून उदयास येत असून राज्याच्या पर्यटन विकासात मोलाचा वाटा उचलत आहे.
मात्र, गेल्या अनेक दिवसांपासून गणपतीपुळे परिसरात सातत्याने व वारंवार वीजपुरवठा खंडित होत आहे. अनेकदा दिवसातून चार ते पाच तास वीज नसल्यामुळे पर्यटनासाठी आलेले पर्यटक तसेच स्थानिक लॉज, हॉटेल व अन्य व्यावसायिक यांच्यात वादविवाद होत आहेत. वीज नसल्यामुळे पर्यटकांना मूलभूत सुविधा मिळत नसून, काही ठिकाणी पर्यटकांकडून लॉज व हॉटेल व्यावसायिकांकडे पैसे परत मागण्याच्या घटना घडत आहेत. यामुळे पर्यटन व्यवसायावर तसेच परिसराच्या प्रतिमेवर नकारात्मक परिणाम होत आहे.
आपण आपल्या स्तरावरून महावितरण यंत्रणेस योग्य त्या सूचना देऊन गणपतीपुळे येथे वीजपुरवठा नियमित, सुरळीत व अखंडित ठेवण्याबाबत तातडीने आवश्यक कार्यवाही करावी, अशी मागणी श्री. भाटलेकर यांनी निवेदनाद्वारे केली आहे.



