
ओळख महाभारताचीभाग ९धनंजय चितळे
सत्यप्रिय गांधारी
बरेच वेळा एखाद्या व्यक्तिरेखेविषयी आपण काही पूर्वग्रह करून घेतो आणि तशाच दृष्टीने तिच्याकडे पाहतो. धृतराष्ट्राची पत्नी किंवा दुर्योधनादी शंभर कौरवांची आई अशी ओळख असल्यामुळे गांधारी ही तशीच कुटिल वृत्तीची असावी, असा आपला समज असतो. पण महाभारत पाहिले तर आपल्याला गांधारीचे खरे स्वरूप कळते. सुबल राजाची मुलगी असणारी गांधारी आपला पती अंध असल्याचे कळल्यावर स्वतःच्या डोळ्यांवर पट्टी बांधून स्वखुशीने अंध झाली. तिच्यासह तिचा भाऊ शकुनी पण हस्तिनापुरात आला. आपल्या भावाचा स्वभाव गांधारीला पूर्ण माहीत होता आणि म्हणूनच ती आपल्या नवऱ्याला सांगते की, `शकुनी हा गांधार देशातून कुरुकुलात शिरलेला एक कलिपुरुष आहे, तेव्हा सर्वप्रथम त्याला हद्दपार करावे.'' पण पुत्रमोहाने अंध झालेल्या धृतराष्ट्राने तिचे म्हणणे ऐकले नाही. उलट एका प्रसंगी त्याने गांधारीलाकुरुवंशाचा सर्वनाश होणार असेल तर तो होऊ दे’, असे सांगितलेले दिसते.
आणखी एका प्रसंगी गांधारीची कठोर सत्यनिष्ठा दिसून येते. जेव्हा द्रौपदी वस्त्रहरणाचा प्रसंग घडून गेला, तेव्हा पांडवांनी पुन्हा द्यूत खेळावे, त्यामध्ये त्यांना हरवून त्यांना बारा वर्षे वनवास आणि एक वर्ष अज्ञातवासात पाठवावे, अशी योजना कपटी शकुनी आणि दुर्योधन आणि सहकाऱ्यांनी आखली. त्यासंदर्भात राजाची मान्यता घेण्यासाठी ही सर्व मंडळी धृतराष्ट्राला भेटायला आली. त्यावेळी गांधारी धृतराष्ट्राला म्हणते, “हे भरत वंशश्रेष्ठा, अपराध गिळून मुकाट्याने गेलेल्या कुंतीपुत्र पांडवांना पुन्हा खिजवावे हे उचित आहे का? आपण सर्व जाणतच आहात. तथापि आपणाला पुन्हा एका गोष्टीची आठवण करून देते, स्वभावताच ज्याची बुद्धी दुष्ट आहे, जो शास्त्राच्या किंवा अन्य कशाच्याच योगाने चांगल्या मार्गाला लागणे शक्य नाही, अशा दुर्योधनाकरिता आपण काही करू नये. निदान वृद्धांनी तरी अशा मूर्खाच्या नादाला लागू नये. महाराज, आपल्या आज्ञेमध्ये पुत्र असावा. आपण पुत्राच्या आज्ञेमध्ये राहू नये.”
द्रौपदी वस्त्राहरणाच्या वेळीही गांधारीने दुर्योधनाची कठोर निंदा केली आणि पुढे म्हणाली, भारतकुलाच्या पूर्वजांनो, मला क्षमा करा. कारण या वंशाच्या अपमानाचा अंकुर माझ्या गर्भातून फुटलेला आहे.” द्रौपदी वस्त्रहरणानंतर अत्यंत खिन्न मनाने ती म्हणते,ज्या राज्यात पुत्रवधूची विटंबना झाली, त्या राज्याची महाराणी म्हणून घेण्यात काही गर्व नाही.”
युद्धाच्या प्रारंभी सर्व कौरव तिला नमस्कार करण्यासाठी येतात तेव्हा ती सर्वांना, “जी बाजू धर्माची आहे ती विजयी होईल”, असा आशीर्वाद देते.
आपल्या डोळ्यांवर पट्टी बांधलेली ही गांधारी खऱ्या अर्थाने डोळस होती, असेच म्हणावे लागते. तिच्या या न्यायनिष्ठ वृत्तीमुळे महाभारत युद्धानंतर ती जेव्हा भगवान श्रीकृष्णांना फटकळपणाने काही सांगते, तेव्हा देव तिचे ऐकून घेतात. गांधारी ही पांडवांची पक्षपाती नव्हती. तिच्या मनात आपल्या मुलांविषयी, नातवंडांविषयी खरेखुरे प्रेम होते. पण आपण एका मोठ्या श्रेष्ठ वंशाच्या महाराणी आहोत आणि सत्यनिष्ठेने आपल्याला काम करावयाचे आहे, याचे भान तिने अखंड ठेवले होते. दुर्दैवाने धृतराष्ट्र या वृत्तीचा नव्हता. तो केवळ आपल्या मुलांचे भले व्हावे, त्यासाठी अन्य लोकांवर अन्याय झाले तरी चालतील, अशी धारणा असणारा स्वार्थी जीव होता. गांधारीने वारंवार दिलेल्या सूचनांपैकी एखादी जरी त्याने ऐकली असती, तरी महाभारत बदलले असते, असेच म्हणावेसे वाटते.
(क्रमशः)



