
हर्षदा जोशी मुंबई उपनगर १४ वर्षाखालील खो-खो संघात निवड
दापोली तालुक्यातील शिवाजीनगर आडे, वाडी नं. २ येथील सभासद श्री. राजेश हरिश्चंद्र जोशी यांची कन्या कुमारी हर्षदा राजेश जोशी (अ. भी. गोरेगावकर विद्यालय, गोरेगाव – मुंबई) हिने मुंबई उपनगर १४ वर्षाखालील खो-खो संघात निवड मिळवत दापोली तालुक्याच्या क्रीडा क्षेत्रात मानाचा तुरा खोवला आहे.
कोकणच्या मातीतून घडलेल्या हर्षदाने लहान वयातच खो-खो सारख्या वेग, चपळता आणि कौशल्य आवश्यक असलेल्या खेळात आपल्या गुणवत्तेचा ठसा उमटवला आहे. सातत्यपूर्ण सराव, शिस्तबद्ध मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर तिने ही उल्लेखनीय कामगिरी साध्य केली असून तिच्या या यशामुळे दापोली तालुक्याचा नावलौकिक मुंबई उपनगर स्तरावर अधोरेखित झाला आहे.
या निवडीमुळे जोशी कुटुंबीयांसह संपूर्ण शिवाजीनगर आडे परिसरात आनंदाचे वातावरण आहे. भविष्यात जिल्हा, राज्य तसेच राष्ट्रीय स्तरावरही हर्षदा आपली क्रीडा गुणवत्ता सिद्ध करेल, असा विश्वास क्रीडाप्रेमी व नागरिकांकडून व्यक्त केला जात आहे. हर्षदा जोशी हिच्या या गौरवशाली यशाबद्दल सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.




