
ओळख महाभारताची भाग ७ धनंजय चितळे
महाभारत ग्रंथातील राजकारण
भारत हा जगातील सर्वांत मोठा लोकशाहीप्रधान देश आहे. या देशात निवडणुकांमध्ये आपली बाजू मजबूत करण्यासाठी शत्रूपक्षाला आपलेसे करणे सर्रास घडत असते. त्यासाठी विशेष नीतीचा अवलंब केला जातो, आयाराम गयारामांना काही लाभ दिले जातात. समजा असे प्रकार महाभारतात घडले होते हे कोणी सांगितले तर? आश्चर्य वाटले ना! आज अशीच एक कथा पाहू या.
पंडू राजाची धाकटी पत्नी माद्री ही मद्रदेशाची राजकन्या होती. तिच्या भावाचे नाव शल्य असे होते. हा शल्य उत्तम योद्धा तर होताच, पण अद्वितीय सारथी होता. ज्यावेळी कौरव-पांडवांमध्ये युद्ध होणार हे निश्चित झाले, त्यावेळी दोन्ही पक्षांनी आपापल्या बाजूला अधिकाधिक राजे यावेत, आपले सैन्यबळ चांगले असावे, यासाठी कंबर कसली होती. धर्मराज युधिष्ठिराने नकुल-सहदेवांच्या शल्यमामाकडे आपला दूत पाठवून मदत करण्याची विनंती केली. राजा शल्यही आपले मोठे सैन्य घेऊन निघाला. ही बातमी दुर्योधनाला कळली आणि त्याने शल्याला आपल्याकडे वळवण्यासाठी एक योजना केली. त्याने शल्याच्या वाटेवर विविध ठिकाणी उत्तम छावण्या, शामियाने उभे केले. तेथे सैनिकांना स्वादिष्ट जेवण, स्वच्छ पाणी, हत्ती-घोड्यांना चारापाणी मिळेल याची व्यवस्था केली. पहिल्या तीन-चार मुक्कामांना ही व्यवस्था पाहिल्यावर शल्य खूप प्रभावित झाला. त्याला वाटले, ही सर्व व्यवस्था पांडवांनी केली आहे. म्हणून एका मुक्कामाला त्याने तेथील सैनिकांना सांगितले, “मी तुमच्यावर प्रसन्न आहे. तुमच्या राजाला बोलवा. मी त्याला हवे ते देईन.”
त्या सैनिकांनी शल्याचा हा निरोप दुर्योधनापर्यंत पोहोचवला. आपली योजना यशस्वी झाली, या आनंदात दुर्योधन शल्याच्या भेटीला आला. शल्याने त्याला सांगितले, “मी तुझ्या व्यवस्थेवर प्रसन्न आहे. तुला काय हवे आहे ते सांग.” दुर्योधन म्हणाला, “महाराज, तुम्ही आमच्या बाजूने युद्धाला उभे राहा.”
आपण कोणताही विचार न करता वचन देऊन मोठी चूक केली, हे शल्याच्या लक्षात आले. पण काय उपयोग? तोपर्यंत वेळ निघून गेली होती. शल्याने दुर्योधनाला एकच विनंती केली, “राजा, तुला दिलेल्या शब्दाप्रमाणे मी तुझ्या बाजूने युद्ध करेन. पण युद्धापूर्वी मी माझ्या भाच्यांना भेटून येतो.”
दुर्योधनाने ते म्हणणे मान्य केले आणि शल्य पांडवांकडे पोहोचला. त्याने पांडवांना झालेली गोष्ट सांगितली. युधिष्ठिर म्हणाला, “शल्यमामा, आता घडले ते घडले. तुम्ही आमच्यासाठी एकच काम करा, या युद्धादरम्यान कर्ण आणि अर्जुन हे समोरासमोर उभे राहतील, तेव्हा दुर्योधन तुम्हाला अंगराज कर्णाचा सारथी होण्याची विनंती करेल. तेव्हा तुम्ही त्याचा धीर खचेल असे भाषण करा. अर्जुनाबरोबर लढण्यापूर्वीच त्याचे मानसिक खच्चीकरण करण्याचा प्रयत्न करा.”
शल्याने ही विनंती मान्य केली आणि महाभारत युद्धामध्ये तसे करूनही दाखवले. आहे ना हे आत्ताच्या काळाला शोभणारे राजकारण? म्हणूनच असे म्हटले जाते की जगात जे जे काही घडले आहे, घडत आहे आणि पुढे घडणार आहे, ते सर्व महाभारतात आहे.
आपल्या अलौकिक प्रतिभेच्या जोरावर हा महाभारताचा कथाभाग शब्दबद्ध करणाऱ्या महर्षी व्यासांच्या चरणांना वारंवार नमस्कार करू या.
(क्रमशः)




