राज्यात झालेल्या नगरपरिषद निवडणुकीत नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात?


राज्यातील २८७ नगरपरिषदा आणि नगरपंचायतींचे अध्यक्ष आणि नगरसेवक निवडणुकीची मतमोजणी आज रविवारी सकाळी १० वाजल्यापासून सुरू होणार असून, दुपारपर्यंत विजयाचा गुलाल उधळला जाईल.पहिल्या टप्प्यात २ डिसेंबरला झालेली निवडणूक आणि दुसऱ्या टप्प्यात उर्वरित २३ नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या अध्यक्ष व १४३ सदस्यपदांसाठी शनिवारी झालेल्या मतदानात कोणाला कौल मिळाला, हे निकालानंतर स्पष्ट होणार आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राज्यात सत्ता असलेल्या पक्षांनाच कौल मिळतो हा आजवरचा बव्हंशी अनुभव बघता यावेळी महायुतीतील तीन पक्षांना तुलनेने चांगले यश मिळेल, असे मानले जात आहे. मात्र, हे तीन पक्ष अनेक ठिकाणी एकमेकांच्या विरोधात लढल्याने त्याचा फायदा महाविकास आघाडीला आणि मुख्यत्वे काँग्रेसला काही ठिकाणी नक्कीच होईल, असाही अंदाज आहे.

‘एक्झिट पोल’च्या अंदाजात भाजप अग्रेसर
तीन मराठी वृत्तवाहिन्यांनी नगरपरिषद निवडणुकीचा एक्झिट पोल दिला असून, त्यात भाजप हा निर्विवादपणे क्रमांक एकचा पक्ष राहील असे म्हटले आहे. दोन वृत्तवाहिन्यांनी दुसऱ्या क्रमांकावर शिंदेसेना, तर तिसऱ्या क्रमांकावर काँग्रेस असेल. त्यानंतर अजित पवार गटाला यश मिळेल, असा अंदाज वर्तविला आहे. अन्य एका वृत्तवाहिनीने भाजपकडे १४७ नगरपरिषदांची अध्यक्षपदे जातील, असे म्हटले असून, शिंदेसेना क्रमांक २ वर, अजित पवार गट क्रमांक ३ वर, तर काँग्रेस क्रमांक ४ वर राहील, असे म्हटले आहे. एक्झिट पोलचे हे अंदाज कितपत खरे ठरतात याची उत्सुकता असेल.भाजप आणि शिंदेसेना हे सत्तेतील दोन पक्ष एकमेकांविरुद्ध अनेक ठिकाणी उभे ठाकले, त्यात कोण कोणावर मात करणार?
काँग्रेसने बहुतेक ठिकाणी स्वबळावर निवडणूक लढविली. हा प्रयोग कितपत यशस्वी झाला?
ठाणे, रायगडसह कोकणच्या पट्टयात वर्चस्व कोणाचे ? भाजपचे की शिंदेसेनेचे?
विदर्भातील लहान शहरांचा गड कोणाकडे? भाजपकडे की काँग्रेसकडे?
भाजप क्रमांक एकवर अपेक्षित पण दुसऱ्या स्थानी कोण? काँग्रेस की शिंदेसेना?हे चित्र आज स्पष्ट होणार आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button