
हातखंबा गावचे सुपुत्र गणपत तारवे यांना ‘कोकण रत्न’ सन्मान..
रत्नागिरी : स्वतंत्र कोकण राज्य अभियानांतर्गत मुंबई येथे आयोजित करण्यात आलेल्या विशेष कार्यक्रमात रत्नागिरी जिल्ह्यातील हातखंबा गावचे सुपुत्र गणपत नामदेव तारवे यांना ‘कोकण रत्न’ पदवी पुरस्काराने गौरविण्यात आले. संस्थापक संजय कोकरे तसेच ज्येष्ठ पत्रकार व संपादक सचिन कळझूनकर यांच्या हस्ते हा सन्मान प्रदान करण्यात आला.
गेल्या अनेक वर्षांपासून कोकणातील लोककलेच्या माध्यमातून समाजप्रबोधन आणि सामाजिक कार्याचा ध्यास घेऊन कार्यरत असलेल्या श्री. तारवे यांनी आपल्या कलाविष्कारातून सामाजिक प्रश्नांवर प्रभावी मांडणी केली आहे. लोककला हे केवळ मनोरंजनाचे साधन नसून समाजपरिवर्तनाचे प्रभावी माध्यम ठरू शकते, हे त्यांनी आपल्या कार्यातून सातत्याने अधोरेखित केले आहे.
श्री. तारवे यांच्या सामाजिक आणि सांस्कृतिक योगदानाची दखल घेत यापूर्वीही त्यांना शासकीय पातळीवर विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. मात्र, ‘कोकण रत्न’ हा सन्मान त्यांच्या दीर्घकालीन कार्याची आणि कोकणाच्या सांस्कृतिक परंपरेला त्यांनी दिलेल्या योगदानाची पोचपावती मानली जात आहे. या सन्मानामुळे कोकणातील लोककला क्षेत्रात आनंदाचे वातावरण असून, कलाकार, सामाजिक कार्यकर्ते आणि रसिकांकडून श्री. तारवे यांच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.




