
रत्नागिरीतील प्रभाग १० मध्ये २० डिसेंबरला चार केंद्रांवर होणार मतदान
मतमोजणीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज : रत्नागिरी, चिपळूणमध्ये वाहतुकीत बदल
जिल्हाधिकारी मनुज जिंदल
रत्नागिरी जिल्ह्यातील ४ नगरपालिका आणि ३ नगरपंचायतींच्या निवडणुकीसाठीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली असून, या निवडणुकीची मतमोजणी रविवार (२१ डिसेंबर) रोजी सकाळी १० वाजल्यापासून सुरू होणार असून, प्रशासनाने यासाठी जय्यत तयारी केली आहे. दरम्यान, रत्नागिरी नगरपालिकेतील प्रभाग क्रमांक १० मधील मतदान न्यायालयीन अपिलामुळे लांबणीवर पडले असून, तेथील मतदान २० डिसेंबर रोजी ४ केंद्रांवर घेतले जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी आज (१८ डिसेंबर) पत्रकार परिषदेत दिली.
जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आकडेवारीनुसार, जिल्ह्यात एकूण १ लाख ६० हजार ४६८ मतदारांपैकी १ लाख ९ हजार ४२६ मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये महिला मतदारांचा सहभाग पुरुषांच्या तुलनेत अधिक राहिला आहे. सर्वाधिक मतदान गुहागर (७५.२६ टक्के) आणि राजापूर (७४.५५ टक्के) येथे झाले, तर रत्नागिरी शहरात सर्वात कमी म्हणजे ५५.०९ टक्के इतके मतदान झाले. संपूर्ण जिल्ह्यात सरासरी ६८.१४ टक्के मतदान झाले.
अधिक माहिती देताना श्री. जिंदल म्हणाले, “रविवारी होणाऱ्या मतमोजणीसाठी प्रशासनाने शहरांनुसार स्वतंत्र ठिकाणे आणि टेबलांची व्यवस्था केली आहे. रत्नागिरीसाठी नगरपालिका कार्यालयातील संत गाडगेबाबा सभागृहात १६ टेबलांवर, तर चिपळूणसाठी युनायटेड इंग्लिश स्कूलमधील गुरुदक्षिणा सभागृहात १४ टेबलांवर मतमोजणी होईल. खेड आणि राजापूरसाठी प्रत्येकी ५, लांजासाठी ७, देवरुखसाठी ९ आणि गुहागरसाठी ६ टेबलांची व्यवस्था करण्यात आली आहे. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या माध्यमातून अधिकृत निकाल जाहीर केले जातील.”
मतपेट्या ठेवण्यात आलेल्या ‘स्ट्राँग रूम’मध्ये सुरक्षेच्या दृष्टीने एसआरपी आणि पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सीसीटीव्ही कॅमेरे, अग्निशमन यंत्रणा आणि स्ट्रक्चरल ऑडिटसह सर्व सुरक्षा उपाययोजना पूर्ण झाल्या आहेत. मतमोजणी केंद्राबाहेर माध्यम प्रतिनिधींसाठी स्वतंत्र माध्यम कक्षाची उभारणी करण्यात आली आहे. मतमोजणी दिवशी रत्नागिरी आणि चिपळूण शहरातील वाहतुकीत बदल केला असून, पर्यायी मार्गांचे नियोजन केले असल्याचे श्री. जिंदल यांनी सांगितले.
या संपूर्ण प्रक्रियेत पोलीस आणि जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी नागरिकांना केले आहे.


