ओळख महाभारताची भाग ३ धनंजय चितळे


जयद्रथ आणि युधिष्ठिर

पांडवांचे चरित्र बघताना त्यातील चांगल्या गोष्टी जशा बोधप्रद आहेत, तशा त्यांच्या काही चुकाही आपल्याला शिकवतात. महर्षी व्यास यांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी सर्व व्यक्तींना त्यांच्या गुणदोषांसह रेखाटले आहे. संस्कृतमध्ये एका सुभाषितात माणसाने आपले कर्ज, अग्नी, शत्रू यांचा समूळ बीमोड करावा, असे सांगितले आहे. धर्मराज युधिष्ठिर याबाबतीत एका प्रसंगात कशी चूक करून बसला, ते आता बघू या.
जेव्हा पांडव काम्यकवनात राहत होते, तेव्हाची ही गोष्ट आहे. पांडवांच्या वनवासाचे अकरावे वर्ष चालू होते. एक दिवस सर्व पांडव शिकारीला गेले होते आणि द्रौपदी एकटीच आश्रमात होती. आश्रमाजवळून सिंधू देशाचा राजा जयद्रथ ससैन्य जात होता. प्रवास करताना त्याची नजर आश्रमीय परिसरावर पडली आणि त्याला द्रौपदी दिसली. तिचे अनुपमेय सौंदर्य पाहून तो तिच्यावर लुब्ध झाला. त्याने आपल्याबरोबर असलेल्या कोटीकास्य राजाला तिच्याकडे बोलणी करण्यासाठी पाठवले. द्रौपदीने आपण द्रुपद राजाची कन्या असून पांडवांची पत्नी आहोत, असे सांगून आपण आमच्या आश्रमीय परिसरात आला आहात तर आमच्या पाहुणचाराचा स्वीकार करावा, अशी विनंतीही केली. त्याप्रमाणे जयद्रथ आणि सर्व मंडळी पांडवांच्या आश्रमात आली. त्यावेळी जयद्रथाने निर्लज्जपणाने द्रौपदीला आपल्या पतींना सोडून माझ्याबरोबर चल, मी तुला सुखात ठेवीन, असे सांगितले. जयद्रथाचे हे बोलणे ऐकून द्रौपदीने त्याची कडक शब्दांत निंदा केली. जयद्रथ हा दुर्योधनाचा मेव्हणा म्हणजे पांडवांच्या पण चुलत बहिणीचा नवरा होता. तरीही ते नाते विसरून वासनांध जयद्रथाने द्रौपदीला बळजबरीने रथात घातले आणि तो रथ घेऊन निघाला. जेव्हा भीम आणि अर्जुनाला हे वृत्त कळले, तेव्हा त्यांनी जयद्रथाला अडवले आणि त्याला पराभूत करून द्रौपदीला सोडवले. त्यांनी जयद्रथाला बंदीवान करून युधिष्ठरासमोर आणले. युधिष्ठराने त्याला सोडून दिले.
आपल्या अपमानाचा बदला घेण्यासाठी जयद्रथाने उग्र तप करून शंकरांना प्रसन्न करून घेतले. जयद्रथाने मी पांडवांच्यावर विजय मिळवेन, असे वरदान मला द्या, असे सांगितले. भगवान श्री शंकरांनी तू अर्जुन सोडून बाकी चौघांना एक दिवस हरवू शकशील, असा वर दिला. याच वराचा उपयोग अभिमन्यूला मारताना झाला.
वाचकहो, या कथेमधील सर्वांत महत्त्वाचा भाग म्हणजे जरी आपल्या नात्यातील व्यक्ती असली तरी तिला तिच्या अपराधाची शिक्षा द्यायलाच हवी. तसेच जयद्रथासारख्या राजाला क्षमा केली तर तो पुन्हा आपल्यालाच त्रास देणारा ठरू शकतो, असा विचार युधिष्ठिराने करण्याची आवश्यकता होती. या ठिकाणी बहलोलखानाला सोडून देणाऱ्या सेनापती प्रतापराव गुर्जर यांना छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेल्या कडक आज्ञेचे स्मरण होते. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी आपल्या सहा सोनेरी पाने या पुस्तकात सद्गुणांचा अतिरेक म्हणजे दुर्गुण असे म्हटले आहे. युधिष्ठराकडे असलेला अतिरेकी चांगुलपणा हा येथे दुर्गुणच ठरला आणि त्याचा परिणाम अभिमन्यूला भोगावा लागला. बरोबर आहे ना?
पुढील भागात महाभारतातील विद्वान विदुराची नीती राजाच्या आचरणाबद्दल काय सूचना देते, ते पाहू या.
(क्रमशः)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button