
राज्य सरकारने शेतकर्यांसाठी केला साडेतीन कोटीचा निधी मंजूर
ऑक्टोबर महिन्यात ऐन भात कापणीच्या हंगामात अवकाळी पावसाने जिल्ह्यातील शेतकर्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला होता. अतिवृष्टीमुळे भात आणि नाचणी पिकाचे झालेले मोठे नुकसान पाहता आता राज्य सरकारने येथील शेतकर्यांसाठी ३ कोटी ६६ लाख ८२ हजार रुपये इतका निधी मंजूर केला आहे. ज्यामुळे संकटात सापडलेल्या बळीराजाला मोठा दिलासा मिळाला आहे.
यंदा पावसाने दमदार हजेरी लावल्यामुळे भात आणि नाचणीचे पीक चांगले बहरले होते. उत्पादन वाढण्याची आशा असतानाच ऐन कापणीच्या वेळी सातत्याने आलेल्या अवकाळी पावसाने सर्व होत्याचे नव्हते केले. कापलेल्या भाताला शेतातच अंकुर फुटले तर काही ठिकाणी उभी पिकेही कुजून गेली. भातपिकांमध्ये पाणी साचल्यामुळे शेतकरी हताश झाले होते.
www.konkantoday.com




