
राज्य परिवहन मंडळाच्या आंतरविभागीय नाट्य स्पर्धेत रत्नागिरी विभागाचे डॉक्टर तुम्ही सुद्धा नाटक ठरले अव्वल
महाराष्ट्र राज्यमार्ग परिवहन महामंडळ व राज्य परिवहन कामगार कल्याण समितीतर्फे आयोजित आंतरविभागीय नाट्य स्पर्धेच्या सातारा केंद्रावर झालेल्या फेरीमध्ये एकूण पाच नाटके सादर झाली. त्यामध्ये रत्नागिरी विभागाने आपल्या यशाची मोहोर उमटवली आहे. या स्पर्धेत सादर केलेल्या डॉक्टर तुम्हीसुद्धा या नाटकाने प्रथम क्रमांक पटकावून अंतिम स्पर्धेसाठी स्थान मिळवले आहे.
स्पर्धेत पुरूष गटात अभिनयाचे प्रथम पारितोषिक प्रशांत आडीवरेकर, तर स्त्री गटाचे पारितोषिक श्रद्धा मयेकर यांना जाहीर झाले आहे. तसेच दिग्दर्शनाचे प्रथम पारितोषिक राजेश मयेकर, नेपथ्य व रंगमंच व्यवस्था प्रथम पारितोषिक प्रवीण बापर्डेकर, विजय मेस्त्री, रविंद्र तेरवणकर यांनी पटकावले.
राज्य परिवहन कामगार कल्याण समितीतर्फे आंतरविभागीय नाट्य स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यावर्षी स्पर्धेचे ५३ वे वर्ष होते. अजित दळवी लिखित राजेश मयेकर, दिग्दर्शित डॉक्टर तुम्ही सुद्धा हे नाटक यावर्षी स्पर्धेत सादर करण्यात आले. विभाग नियंत्रक प्रज्ञेश बोरसे, यंत्र अभियंता (चालन) अनंत कुलकर्णी, सोनाली कांबळे, यंत्र अभियंता मृदुला जाधव, कामगार अधिकारी भक्ती फुटाणे यांच्या मार्गदर्शनाखाली हे नाटक सादर करण्यात आले.www.konkantoday.com




