
अल्पसंख्याक कक्षामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांचा लाभ घ्यावा- जिल्हा अल्पसंख्याक अधिकारी अमर पाटीलसंविधानाची प्रत घराघरात हवी: घराबाहेर आपण भारतीय हे अभिमानास्पद-इम्तियाज सिध्दीकी
रत्नागिरी, दि. 18 ):- जिल्हा अल्पसंख्याक. कक्षामार्फत विविध योजना राबविण्यात येत असतात. या योजनांचा लाभ संबंधितांनी घेण्याबाबत त्याची माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचवावी तसेच या योजनांचा लाभ घ्यावा56 योग असे आवाहन प्र. जिल्हा नियोजन अधिकारी तथा जिल्हा अल्पसंख्याक अधिकारी अमर पाटील यांनी केले. अल्पसंख्याक असलो तरी प्रथम आपण भारतीय आहोत. त्याचा अभिमान बाळगायला हवा. त्यासाठी संविधान समजून घ्यायला हवे. धर्मग्रंथाइतकेच संविधान महत्त्वाचे असल्याने ते घराघरात हवे, असे मार्गदर्शन इम्तियाज सिध्दीकी यांनी केले.
जिल्हा अल्पसंख्याक कक्षामार्फत नियोजन समिती सभागृहात अल्पसंख्याक हक्क दिवस साजरा करण्यात आला. यावेळी ‘अल्पसंख्याक नागरिकांना त्यांच्या घटनात्मक व कायदेशीर हक्कांची जाणीव या विषयावर श्री. सिध्दीकी आणि इक्रा इंग्लिश स्कूलचे अध्यक्ष इलियास बगदादी यांनी मार्गदर्शन केले. यावेळी जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते आणि सहायक जिल्हा नियोजन अधिकारी राजेश गवाणकर उपस्थित होते.
प्रास्ताविकात जिल्हा अल्पसंख्याक अधिकारी श्री. पाटील म्हणाले, अल्पसंख्याक कक्षामार्फत अल्पसंख्याक विद्यार्थी बहुल शासनमान्य खासगी शाळा, कनिष्ठ महाविद्यालय औद्योगिक प्रशिक्षण संस्था व अपंग शाळांमध्ये पायाभूत सोयी सुविधा पुरविणे. अल्पसंख्यांक बहुल ग्रामीण क्षेत्रात मुलभूत/पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणे. अल्पसंख्यांक बहुल नागरी क्षेत्रात मुलभूत/पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणे. डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजनेंतर्गत राज्यातील मदरशांना पायाभुत सुविधा पुरविणे. निवासी पोलीस भरती पूर्व परीक्षा प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत प्रशिक्षण प्रस्तावांची छाननी करुन शासनास सादर करणे. अल्पसंख्यांक शाळांना धार्मिक व भाषिक दर्जा प्रमाणपत्र वितरण करणे अशा विविध योजना राबविण्यात येतात. या योजनांचा लाभ घेण्यासाठी याची माहिती सर्वांपर्यंत समाजातील तळागाळातील लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवावी. त्याचबरोबर अल्पसंख्याक कल्याणाकरीता 15 कलमी कार्यक्रम आयोजित केला आहे. त्याबाबतही माहिती पोहोचवावी.
श्री. सिध्दीकी म्हणाले, अल्पसंख्याक समाज शिक्षणापासून वंचित आहे त्यांच्यामध्ये त्याची जनजागृती करणे आवश्यक आहे. अल्पसंख्याक हक्क दिवसाचे महत्व समजून घेण्यासाठी जागरुक होणे आवश्यक आहे. ज्या अल्पसंख्यांक शाळा आहेत या शाळांचा शैक्षणिक दर्जा आपल्याला वाढवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणे गरजेचे आहे. अल्पसंख्यांक समाजाला प्रगती करायची असेल तर ज्यावेळी एक माणूस शंभर पाऊल पुढे चालतो त्याला प्रगती म्हणत नाही ज्यावेळेला शंभर माणसं मिळून एक पाऊल पुढे टाकतात याला प्रगती म्हणतात आणि अशा पद्धतीची प्रगतीची गरज आहे.
भारतीय संविधान समजून घ्या कारण आज आम्ही संविधान समजून न घेतल्यामुळे आज आम्ही पिछाडीवरती आहोत जेव्हा आपल्याला संविधान आणि हक्क न्याय व कायदा सुव्यवस्था समजेल त्यावेळी निश्चितच आपण अल्पसंख्यांक समाज म्हणून निर्माण नाही तर आपण या देशातला एक महत्त्वपूर्ण घटक म्हणून मिरवणार आहोत. कलम 29 आणि 30 दिलेला आहे की अल्पसंख्यांकांना त्यांच्या आवडीच्या शैक्षणिक संस्था स्थापन करण्याचा आणि चालवण्याचा अधिकार आहे त्याचबरोबर सर्व अल्पसंख्याकांना त्यांचे धर्म पाळण्याचा भाषा बोलण्याचा आणि संस्कृती जपण्याचा सुद्धा पूर्ण अधिकार आहे. पायाभूत सुविधांबरोबर अल्पसंख्यांक समाजाच्या शैक्षणिक सोयी सुविधांवरसुद्धा तितकीच भर देण्याची गरज आहे, असेही सिध्दीकी म्हणाले.
श्री. बगदादी म्हणाले, विविध भाषा, धर्म आणि पंथाचे असलो तरी ज्ञान आणि शिक्षण यावरच समाज प्रगती करु शकतो. संविधानाने आपल्या तो हक्क दिला आहे. मोठी विद्यापीठे आणि महाविद्यालयामध्ये शिक्षण घेतल्यानंतर स्पर्धेत पुढे जाता आले पाहिजे. आपले हक्क समजून घेण्यासाठी आपल्याला प्रयत्न केले पाहिजेत. एकमेकांना माहिती दिली पाहिजे. एकमेकांसोबत पुढे जाता आले पाहिजे. त्यासाठी मेहनत करायला हवी. आपल्या समाजाचा फायदा करुन देता आला पाहिजे. चांगले नागरिक बनण्यासाठी शिक्षणाची आवश्यक ता असते. देशात भरपूर संधी आहेत त्यासाठी विद्यार्थ्यांनी मेहनत आणि प्रयत्न करुन त्या मिळविल्या पाहिजेत. असेही ते म्हणाले.
राधिका भाटवडेकर यांनी आभार प्रदर्शन केले.




