
मालवण चिवला बीच येथे चक्कर आल्याने जलतरण स्पर्धेत भाग घेतलेल्या पुण्यातील स्पर्धकाचा मृत्यू,
मालवण शहरातील चिवला बीच या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय सागरी जलतरण स्पर्धेत सहभागी झालेले स्पर्धक पराग शरद टापरे (५३, रा.कोथरुड, पुणे) हे स्पर्धा संपवून किनाऱ्यावर आल्यानंतर त्यांना चक्कर आली आणि ते किनाऱ्यावरील वाळूत कोसळले.त्यांना तत्काळ प्राथमिक उपचार करत, ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले होते. मात्र, त्यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद केली आहे. ही घटना रविवारी दुपारी १२ वाजता घडली.
सागरी जलतरण स्पर्धेसाठी तीन किलोमीटर गटातून पराग टापरे यांनी सहभाग घेतला होता. समुद्रातून ते किनाऱ्यावर पोहत आले. मात्र, किनाऱ्यावर आल्यानंतर त्यांना अस्वस्थ वाटू लागले. अचानक चक्कर आल्याने ते कोसळले. त्यांना आयोजकांच्या वैद्यकीय पथकाकडून तत्काळ प्राथमिक उपचार सुरू करण्यात आले आणि अधिक उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांचा मृत्यू झाल्याचे जाहीर केले.




