
गणपतीपुळे समुद्रात बुडणाऱ्या १५ वर्षीय मुलाला जीवनदान
किनाऱ्यावरील जीवरक्षकांची सतर्कता
रत्नागिरी : तालुक्यातील गणपतीपुळे समुद्रकिनारी १५ वर्षीय मुलाला समुद्राच्या पाण्यात चक्कर येऊन बुडताना जीवरक्षकांनी व स्थानिक वॉटर स्पोर्ट चालकांनी वाचवले. नंदूरबार जिल्ह्यातून देवदर्शन व पर्यटनासाठी आलेल्या तरुणांच्या ग्रुपमध्ये या मुलाचाही समावेश होता. प्रेम दिलीप अल्हाड असे या तरुणाचे नाव आहे. ही घटना काल (१६ डिसेंबर) दुपारी सुमारे १ वाजण्याच्या सुमारास घडली.
नंदूरबार जिल्ह्यातून एकूण १९ जण गणपतीपुळे येथे आले होते. समुद्रकिनारी खेळण्यात मग्न असताना प्रेम याला समुद्रात जाण्याचा मोह आवरता आला नाही. पाण्याचा अंदाज न आल्याने तो समुद्रात उतरला आणि काही वेळातच बुडू लागला. समुद्रात उतरल्यानंतर त्याला चक्कर आल्याने तो अडचणीत सापडला. हा प्रकार इतरांच्या लक्षात येण्यापूर्वीच तो पाण्यात बुडत असल्याचे गणपतीपुळे समुद्रकिनाऱ्यावरील जीवरक्षक व वॉटर स्पोर्ट रायडिंग करणाऱ्यांच्या निदर्शनास आले.
त्यानंतर जीवरक्षकांनी तत्काळ धाव घेऊन बेशुद्ध अवस्थेत असलेल्या मुलाला समुद्रातून बाहेर काढले. त्यानंतर त्याला तातडीने मालगुंड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात गणपतीपुळे देवस्थानच्या रुग्णवाहिकेने दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर अधिक उपचारासाठी त्याला रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले असून सध्या अतिदक्षता विभागात त्याच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेबाबत जयगड पोलीस ठाण्याच्या मालगुंड गणपतीपुळे पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचाऱ्यांनी तत्काळ समुद्र किनाऱ्यावर धाव घेऊन संबंधित घटनेची माहिती घेतली. तसेच समुद्र किनाऱ्यावर असलेल्या सर्वच पर्यटकांना सतर्कतेच्या सूचना देऊन पाण्याबाहेर काढण्यात आले.




