
शिलाई मशीनच्या आमिषाने ४२४ महिलांची साडेतीन लाखांहून अधिक रकमेची फसवणूक..
चिपळुणातून एकाला पोलिसांनी ताब्यात घेतले, चौकशी सुरू
चिपळूण : सरकारी योजनेतून महिलांना शिलाई मशीन देतो, असे आमिष दाखवून चिपळूण तालुक्यातील शेकडो महिलांची आर्थिक फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी ४२४ महिलांकडून सुमारे ३ लाख ६५ हजार ९७० रुपये उकळल्याचा आरोप असून, संबंधित महिलांनी पोलिसांत तक्रार अर्ज सादर केला आहे. त्यानुसार चिपळूण पोलिसांनी सुभाष सकपाळ (रा. देवघर, ता. गुहागर) याला ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे.
या प्रकरणी मनिषा खेडेकर, श्रेया पाटेकर, रुचिता कदम, स्वरा घारे, रिया देवळेकर आदी महिलांनी पोलिसांकडे तक्रार दिली आहे. तक्रारीनुसार, सरकारी योजनेअंतर्गत महिलांना ६०० ते १७०० रुपये इतक्या नाममात्र रकमेच्या मोबदल्यात शिलाई मशीन देण्याचे आमिष दाखवण्यात आले होते. अवघ्या २५ दिवसांत मशीन देऊ, असे आश्वासन देण्यात आले; मात्र चार महिने उलटूनही एकाही महिलेला शिलाई मशीन मिळाले नाही.
वारंवार विचारणा केल्यानंतर उडवाउडवीची उत्तरे देण्यात येत होती. अखेर मशीन वाटपासाठी १५ डिसेंबरची तारीख देण्यात आली. त्या दिवशी पैसे भरलेल्या महिला चिपळूणमधील हॉटेल अतिथी शेजारील एका खासगी कार्यालयात पोहोचल्या असता, तेथेही समाधानकारक उत्तर मिळाले नाही. यामुळे संतप्त झालेल्या महिलांनी तीव्र संताप व्यक्त केला.
घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी सुभाष सकपाळ याला ताब्यात घेऊन तातडीने चौकशी सुरू केली आहे. सकपाळ याचे काम एका बिल्डरच्या कार्यालयातून सुरू असल्याची माहिती असून, संबंधित बिल्डर कोण आहे व या प्रकरणात त्याचा काही सहभाग आहे का, याबाबतही पोलिस तपास करत आहेत.
सुभाष सकपाळ हा मूळचा गुहागर तालुक्यातील देवघर–गिमवी येथील रहिवासी असून, सध्या तो चिपळूण बाजारपेठेतील वडनाका परिसरात वास्तव्यास आहे. सखोल चौकशीनंतर पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल, अशी माहिती पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांनी दिली आहे.




