
युवा पत्रकार मुझम्मील काझी ‘कलगी तुरा आदर्श पुरस्काराने’ सन्मानित
रत्नागिरी: पत्रकारिता क्षेत्रातील आपल्या उल्लेखनीय योगदानासाठी युवा पत्रकार मुझम्मील काझी यांना नुकतेच मुंबई येथील अत्यंत मानाच्या ‘कलगी तुरा आदर्श पुरस्कार २०२५’ ने गौरवण्यात आले आहे. कलगी तुरा समाज उन्नती मंडळ, मुंबई यांच्या वतीने देण्यात येणारा हा प्रतिष्ठित पुरस्कार, मुझम्मील काझी यांनी माधव कांबळे, सुधाकर मास्कर आणि त्यांचे सहकारी मित्र उदयजी दणदणे यांच्या हस्ते स्वीकारला.
मुझम्मील काझी यांच्या निःस्वार्थ आणि प्रभावी पत्रकारितेची ही दखल मानली जात आहे. शालेय जीवनापासूनच त्यांनी आपल्या लेखणीची धार ओळखली आणि माध्यमिक शिक्षण घेत असतानाच पत्रकारितेला सुरुवात केली. एकीकडे शिक्षण आणि दुसरीकडे सामाजिक भान ठेवून त्यांनी विविध वृत्तपत्रे, वेब पोर्टल्स आणि यूट्यूब चॅनेल्ससाठी काम केले. आपल्या टोकदार आणि परखड लेखणीच्या माध्यमातून त्यांनी समाजातील अनेक ज्वलंत प्रश्न प्रशासनाच्या दरबारी मांडले आणि त्यांना न्याय मिळवून दिला. त्यानंतर त्यांनी आपले अनुभव आणि ग्रामीण भागातील समस्यांचे गांभीर्य लक्षात घेऊन ‘ग्रामीण वार्ता’ नावाचे स्वतःचे डिजिटल माध्यम सुरू केले. ‘ग्रामीण वार्ता’च्या माध्यमातून त्यांनी ग्रामीण भागातील वंचित, शोषित आणि गरजू नागरिकांचे प्रश्न प्रभावीपणे मांडले.
त्यांच्या अथक प्रयत्नातून अनेक स्थानिक समस्या मार्गी लागल्या असून, अनेक पीडितांना न्याय मिळाला आहे. अत्यंत कमी वेळेत ‘ग्रामीण वार्ता’ या डिजिटल मीडियाने मोठी लोकप्रियता मिळवली आहे. मुझम्मील काझी यांच्या विश्वासार्ह पत्रकारितेमुळे आज ‘ग्रामीण वार्ता’ ने तब्बल २७ लाख वाचकांचा महत्त्वाचा टप्पा यशस्वीरित्या पार केला आहे.
डिजिटल पत्रकारिता आणि सामाजिक बांधिलकीची सांगड घालत मुझम्मील काझी यांनी उभ्या केलेल्या या माध्यमाची दखल घेतच त्यांना या वर्षीच्या अत्यंत मानाच्या ‘कलगी तुरा आदर्श पुरस्कार २०२५’ साठी निवडण्यात आले. पुरस्कार स्वीकारताना मुझम्मील काझी यांनी आपल्या सहकारी, वाचक आणि मार्गदर्शकांचे आभार मानले. हा सन्मान फक्त माझा नसून, माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या लाखो वाचकांचा आणि ‘ग्रामीण वार्ता’च्या टीमच्या अथक मेहनतीचा आहे, असे ते म्हणाले. पत्रकारितेतील मूल्यांची जपणूक करत, तरुण वयातच आपल्या कामातून एक ठसा उमटवणाऱ्या मुझम्मील काझी यांच्या या सन्मानाबद्दल त्यांचे पत्रकारिता क्षेत्रातून आणि सामाजिक स्तरातून अभिनंदन होत आहे.




