“मराठी माणसाच्या अस्तित्वाची लढाई, मुंबई वाचवायला…”; संजय राऊतांचा भाजपा-शिंदेसेनेवर निशाणा!

मुंबई : मुंबईसह २९ महापालिका निवडणुकीची घोषणा झाली आहे. ही मराठी माणसाच्या अस्तित्वाची लढाई आहे. मराठी माणूस कुठल्याही परिस्थितीत असो या लढाईत मुंबई वाचवण्यासाठी उतरायला हवे. आम्ही मुंबईचे अनेक लढे पाहिले आणि संघर्ष केला.

मुंबई वाचवण्यासाठी काही पोस्टर लागलेत. मराठी माणसांना आवाहन करण्यात आले. त्यावर कुणाचेही नाव नाही. मात्र सरकारला याची भीती वाटली आणि त्यांनी एका रात्रीत हे पोस्टर आचारसंहितेचा भंग होतो म्हणून काढायला लावले. आचारसंहिता मराठी माणसाला, विरोधी पक्षाला लावली जाते. निवडणूक तारखा जाहीर होण्याच्या १० मिनिटे आधीपर्यंत सरकारी आदेश निघत होते. कोट्यवधीच्या घोषणा करत होते. त्यानंतर हे पूर्ण झाल्यावर निवडणूक तारखांची घोषणा झाली हा आचारसंहितेचा भंग नाही का? असा सवाल करत खासदार संजय राऊत यांनी सत्ताधारी भाजपा आणि शिंदेसेनेवर निशाणा साधला आहे.

खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत म्हटलं की, या निवडणुकीत पैशांचे वाटप प्रचंड होणार आहे. १५ लाखांची मर्यादा मुंबईत दिली आहे. सत्ताधारी पक्ष १५ लाखांवर थांबणार आहे हे निवडणूक आयोग खात्रीने सांगू शकेल का? ज्या सत्ताधारी पक्षांनी नगरपालिकेत, नगरपंचायतीत एका एका ठिकाणी १००-१५० कोटी खर्च केलेत. नगरसेवक फोडण्यासाठी २-२ कोटी खर्च केलेत. ते तिन्ही पक्ष १५ लाखांची खर्च मर्यादा पाळणार आहे का? निवडणूक आयोग त्यासाठी कुठली यंत्रणा लावणार आहे? मुंबई मराठी माणसाच्या हातून हिसकावून घेण्यासाठी जो पैशांचा खेळ चालणार आहे तो निवडणूक आयोग उघड्या डोळ्याने पाहणार आहे अशी टीका त्यांनी केली.

तसेच ही लढाई प्रत्येक मराठी माणसाची आहे. त्याबाबतची जागरूकता शिवसेना उद्धव ठाकरे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे एकत्रित आल्याने ह आत्मविश्वास, उत्साह लोकांमध्ये निर्माण झाला आहे. आम्ही मुंबईसह २९ महापालिकांमध्ये निवडणूक लढवण्यासाठी सज्ज आहोत. भलेही तुम्ही आमच्यावर पाठीमागून वार करा, पैशाचा खेळ करा पण आम्ही आमची लढाई लढणार. या महाराष्ट्रातील मराठी माणसांचा एक गट मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्यासाठी, उद्योगपतीला देण्यासाठी आसूसलेला असताना शिवसेना आणि मनसेचे लोक मुंबई वाचवायला, मराठी माणसाच्या हाती ही मुंबई राहण्यासाठी शौर्याने या लढाईत उतरले होते ही इतिहासात नोंद राहील. त्यानंतरच महाराष्ट्राचे गद्दार कोण आणि खुद्दार कोण हे जनतेला कळेल असं सांगत राऊत यांनी भाजपा आणि एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला.

ठाकरे बंधू युतीची घोषणा कधी?

दरम्यान, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्रित निवडणूक लढतायेत. परंतु महायुतीच्या लोकांना दिल्लीत जाऊन अमित शाहांच्या पायावर डोके ठेवावे लागले. आमच्याशी युती करा असं सांगितले. याक्षणी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आलेत. मुंबई, ठाणे, कल्याण डोंबिवली, मीरा भाईंदर, पुणे, नाशिक या प्रमुख महापालिकेत आम्ही एकत्र लढत आहोत. इतर महापालिकेत स्थानिक पातळीवर निर्णय होतील. ही लढाई २९ महापालिकांपेक्षा ही लढाई मुंबईची आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या लढाईत मुख्य लढाई मुंबईची होती. मुंबई महाराष्ट्रात राहावी हा लढा सुरू झाला आणि त्यात १०६ लोकांनी बलिदान दिले. त्या बलिदानाची तयारी आमची आजही आहे. मुंबई अमित शाहांच्या घशात जाऊ देणार नाही. रहमान डकैत कोण हे महाराष्ट्राला माहिती आहे. येत्या आठवडाभरात शिवसेना-मनसे युतीची घोषणा होईल अशी माहिती संजय राऊत यांनी दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button