
पर्ससिन जाळ्याद्वारे बेकायदेशीर मासेमारी सुरूच
पर्ससिन द्वारे मासेमारी करण्यास बंदी असतानाही समुद्रात पर्ससिन जाळ्याच्या साहाय्याने बेकायदेशीर मासेमारी सुरूच ठेवली आहे. त्यामुळे पारंपारिक मच्छीमारांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ लागले आहे. नुकताच पालघर जिल्ह्याच्या समुद्राच्या भागातून पर्ससिन मासेमारी करणाऱ्या बोटीवर कारवाई केली आहे. त्यामुळे अजूनही अशा प्रकारची मासेमारी सुरूच असल्याने मच्छिमारांनी चिंता व्यक्त केली आहे.
वसई विरार व पालघर जिल्ह्याच्या किनार पट्टीवरील मोठ्या संख्येने मच्छिमार बांधव हे पारंपारिक मासेमारीचा व्यवसाय करतात. त्यावरच त्यांचा उदरनिर्वाह चालतो.मात्र मागील काही वर्षांपासून विविध समस्यांमुळे मच्छिमार अडचणीत सापडत आहेत. त्यातच जास्त मासे आपल्याला मिळावे या लालसेपोटी विविध ठिकाणच्या भागातील खोल समुद्रात रात्रीच्यावेळी यांत्रिक बोटींचा वापर करून पर्ससिन जाळे टाकून मासेमारी करण्याचे प्रकार घडू लागले आहे.
या बेकायदेशीरपणे केल्या जाणाऱ्या मासेमारीचा परिणाम हा इतर पारंपारिक मच्छिमारांवर होऊ लागला आहे. यामुळे शासनाने ही अशा प्रकारच्या बेकायदेशीर मासेमारीवर बंदी आणली आहे.तरीही काही ठिकाणच्या भागात छुप्या पद्धतीने पर्ससिन द्वारे मासेमारी केली जात आहे. याबाबत मच्छिमार संघटनांनी वेळोवेळी मत्स्यविभागाकडे तक्रारी केल्या आहेत. परंतु तक्रार करूनही अपेक्षित कारवाई होत नसल्याचे मच्छीमारांचे म्हणणे आहे. जर अशी मासेमारी सुरू राहिली तर पारंपारीक मत्स्यव्यवसाय धोक्यात येण्याची भीती व्यक्त केली जात आहे. नुकताच पालघर जिल्ह्याच्या समुद्राच्या भागात पर्ससिन जाळे टाकून मासेमारी होत असल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यावर पालघर मत्स्यव्यवसाय विभागाने ही कारवाई केली आहे.
शनिवारी पालघर जिल्ह्याच्या केळवे भागातील ८ ते ९ मैल अंतरावर पर्ससिन जाळे टाकून बेकायदेशीर मासेमारी करणाऱ्या सहा बोटींवर मत्स्यव्यवसाय विभागाने कारवाई करीत त्या जप्त केल्या आहेत. जप्त केलेल्या बोटी वसई कोळीवाडा येथील बंदरात आणून ठेवल्या आहेत. यात ५ बोटी रायगड येथील आहेत तर १ बोट मुंबई येथील असल्याचे सहायक मत्स्यव्यवसाय आयुक्त दिनेश पाटील यांनी सांगितले आहे. त्या बोटीत असलेल्या मासळीचा नायगाव येथे लिलाव करून त्यातून मिळणारा महसुल हा शासन जमा केला जाणार आहे. जप्त केलेल्या बोटी नायगाव येथे ठेवण्यात आल्या असून त्यांच्यावर सागरी कायद्याच्या अंतर्गत गुन्हा दाखल केला असून त्यांची पुढील चौकशी सुरू आहे. याशिवाय पालघर जिल्ह्याच्या समुद्र किनाऱ्याच्या भागात ही बेकायदेशीर मासेमारी होऊ नये यासाठी गस्त सुरू असून जे बेकायदेशीर मासेमारी करताना आढळून येतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल असेही पाटील यांनी स्पष्ट केले आहे.
मासेमारी करणाऱ्या सहा अनधिकृत बोटी पकडल्या असून या बोटी सध्या नायगाव बंदर येथे आणण्यात आल्या आहेत. ही कारवाई स्वागतार्ह असली तरी याआधी अशा अनेक प्रकरणांमध्ये केवळ दंड आकारून बोटी सोडण्यात आल्याने पुन्हा त्याच बोटी बेकायदेशीर मासेमारी करत असल्याचे वारंवार दिसून येत आहे. यामुळे बेकायदेशीर मासेमारीला अप्रत्यक्ष प्रोत्साहन मिळत असून प्रशासनाची कारवाई निष्प्रभ ठरत असल्याचा आरोप मच्छिमार संघटनेचे मिल्टन सौदीया यांनी केला आहे. अशी बेकायदेशीर मासेमारी थांबविण्यासाठी ठोस निर्णय घेऊन कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणीही त्यांनी केली आहे.
आधीच सातत्याने बदलणारे निसर्गचक्र, दूषित समुद्र किनारे, कामगारांची कमतरता, मासेमारी बोटींची वाढती संख्या, इंधनाचे वाढते दर, बंदी कालावधीत होणारी बेसुमार मासेमारी यामुळे देशाला दरवर्षी कोट्यवधी रुपयांचे परकीय चलन मिळवून देणारा हा व्यवसाय सध्या अडचणीत सापडू लागला आहे.




