
नेत्रदान करा.. मृत्यूनंतरही जग पहा नेत्रदान सर्वश्रेष्ठ दान
‘चक्षूवै सत्यम’ अर्थात डोळ्यांनी बघितले ते खरे, असे म्हटले जाते. पण, या डोळ्यांनाच इजा झाली तर, आणि अंधत्व आले तर, आपले भवितव्य अंधकारमय होवून जाईल. देशातील अंधत्वाचे प्रमाण पाहता, त्यासाठी खास उपाय करण्याची गरज आहे हे लक्षात येते. त्यासाठीच 1985 पासून भारत सरकारने राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रमातंर्गत नेत्रदान चळवळ सुरु केली आहे. नेत्रदान हे सर्वश्रेष्ठ दान असे म्हटले जाते. मृत्यूनंतरही डोळे जिवंत ठेवून हे सुंदर जग पहायचे असेल तर नेत्रदान करावे.
भारतामध्ये अंधत्व हा मोठा आरोग्यविषयक प्रश्न होता विशेषत: कॉर्नियल ब्लाइंडनेस (डोळ्याच्या पारदर्शक पडद्याच्या दोषामुळे होणारे अंधत्व) टाळण्यासाठी मरणोत्तर नेत्रदानाची गरज होती. या उपक्रमामुळे दरवर्षी हजारो लोक नेत्रदान करतात तरीही गरजेच्या तुलनेत संख्या अजूनही कमी आहे.
जगातील पहिले नेत्रदान
जगात पहिले यशस्वी नेत्रदान 1905 मध्ये झाले. डॉ. एडूअर्ड झिरम ऑस्ट्रिया येथील नेत्रतज्ञ यांनी जगातील पहिली यशस्वी कॉर्नियलची शस्त्रक्रिया केली. एका शेतकऱ्याचा डोळा दुखावला होता त्याच्यावर हे प्रत्यारोपण करण्यात आले. नेत्रदानासाठी मृत व्यक्तीचा कॉर्निया वापरण्यात आला.
भारतात 1948 मध्ये नेत्रदानाची सुरुवात झाली. डॉ. गोविंदाप्पा व्यंकटस्वामी आणि इतर नेत्रतज्ञांच्या पुढाकाराने नेत्रदान चळवळीला प्रारंभ झाला. सर्वप्रथम नेत्रबँक चेन्नई येथे स्थापन झाली. 1965 मध्ये भारत सरकारने आयबँक असोसिएशन ऑफ इंडिया स्थापन करुन ही चळवळ देशभर राबविली.
महाराष्ट्रात नेत्रदानाची सुरुवात भारतातील पहिल्या टप्प्यानंतर थोड्याच वर्षाने झाली. 1960 च्या दशकात मुंबईत बॉम्बे आय बँक असोसिएशन ही पहिली नोंदलेली नेत्रबँक मानली जाते. पुण्यात हुतात्मा चौकाजवळील नेत्रबँक व नेत्ररुग्णालयाच्या माध्यमातून नेत्रदान सुरु झाले.
रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात 2010 यावर्षी नेत्रसंकलन केंद्र मंजूर झाले.
मृत्यूनंतर कुटूंबिय किंवा नातेवाईक तात्काळ संपर्क साधू शकतात. साधारण सहा ते आठ तासांच्या आत तज्ञपथक घरी/रुग्णालयात येवून कॉर्निया वा संपूर्ण डोळा काढण्याची प्रक्रिया करतात.
‘जिवंतपणी रक्तदान, जाता जाता अवयवदान आणि मृत्यूनंतर नेत्रदान’ यासारखे दान दुसरे नाही. नेत्रदान करणाऱ्याने आधी नेत्रपेढीकडे नाव नोंदविलेले नसले तरी ऐनवेळी देखील मृत व्यक्तीचे नातेवाईक अशी इच्छा व्यक्त करु शकतात व मृत व्यक्तीला नेत्रदान करता येते.
अधिक माहितीसाठी नेत्रदान समुपदेशक राम चिंचोळे मो.क्र. 8208852188, नेत्रचिकित्सा अधिकारी संदिप उगवेकर जिल्हा रुग्णालय रत्नागिरी मो.क्र. 9406596109, राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रम नेत्र विभाग दू.क्र. 02352-222505 जिल्हा रुग्णालय रत्नागिरी यांना संपर्क साधावा. -प्रशांत कुसुम आनंदराव सातपुते जिल्हा माहिती अधिकारी, रत्नागिरी




