
दिव्यांगांनी लुटला झिपलाईन, पॅरामोटरचा आनंद रत्नागिरी हॅंडीकॅप पॅराप्लेजिक फाउंडेशनचा पुढाकार

रत्नागिरी, ता. ३ : अपंगत्वामुळे व्हील चेअर हे जग बनलेल्या वर्षाराणी सावंत, दिव्यांग सुषमा सावंत व भंडारपुळे येथील स्मिता पाटील यांना रत्नागिरी हॅंडीकॅप पॅराप्लेजिक फाऊंडेशनने अनोखी भेट दिली. आरे वारे येथे झिपलाईन आणि मालगुंड येथे पॅरामोटर या धाडसी खेळांचा आनंद या दोघींनी घेतला. यामुळे या दिव्यांगाच्या चेहऱ्यावर हास्य उमलले.
दिव्यांगांना अशा प्रकारे पर्यटनस्थळी जाणेच खूप कठीण असते. परंतु दिव्यांगांसाठी सर्व ती मदत करणाऱ्या रत्नागिरी हॅंडीकॅप पॅराप्लेजिक फाउंडेशनने अनेकांच्या जीवनात आनंद निर्माण केला आहे. वर्षाराणी श्रीपत सावंत (वय ३४ वर्ष, मु.पो.निर्वाळ बहिरीचीवाडी ता. चिपळूण) हिला वयाच्या २१ व्या वर्षापासुन मस्कुलर डिस्ट्रोफी या आजाराने अपंगत्व आले. हळुहळु अंगातली सर्व ताकद कमी कमी होवु लागली, शरीराचा तोल जावू लागला, पायाचे सांधे दुखायला लागले तसे चालणेही कमी झाले. हातात काठी घेऊन चालत होती. तशा परिस्थितीतही ग्रॅज्युएशन पूर्ण केले. आता घराबाहेर पडता येत नाही. घरातल्या घरातच हळुहळु स्वत:ची कामे करते. बर्याच कामात आईची मदत लागते. वर्षाराणीला आता चालणे सहज शक्य नसल्याने घरातच बसावे लागते. अशा परिस्थितीत रत्नागिरी हॅंडीकॅप पॅराप्लेजिक फाउंडेशनने तिला पर्यटन सफर घडवली व साहसी खेळांचा आनंद दिला. यासाठी आरे वारे येथील ओशन फ्लाय झिपलाइनचे सूरज चव्हाण, अर्पित भोसले, अर्सलान पटेल, आदित्य पाटील, रसिका वारेकर, तीर्था शिवलकर, सिद्धेश पालिये व मालक जितेंद्र शिंदे व वर्षाची आई नंदा श्रीपत सावंत तसेच रत्नागिरी हॅंडीकॅप पॅराप्लेजिक फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सादिक नाकाडे व सदस्य समीर नाकाडे यांनी सहकार्य केले.




