
मुंबई-गोवा महामार्ग जनआक्रोश समितीच्या वतीने रखडलेल्या महामार्गप्रश्नी कोकणात ’एल्गार’
मुंबई-गोवा महामार्गाच्या गेल्या १८ – वर्षापासून रखडलेल्या कामाविरोधात मुंबई-गोवा महामार्ग जनआक्रोश समितीने आक्रमक भूमिका घेत महामार्गावर तिरडी आंदोलनाचा मार्ग पत्करला आहे. १३ व १४ डिसेंबर रोजी महामार्गावरील खेड ते चिपळूणदरम्यान आंदोलन छेडण्यात येणार आहे. ११ जानेवारीला आंदोलनाची सांगता होणार आहे.
महामार्गावर रखडलेल्या कामामुळे ४,५०० हून अधिक जणांना हकनाक प्राणास मुकावे लागले. रखडलेले काम पूर्ण होण्यासाठी दरवर्षी नवीन डेडलाईन देण्यात येत असली तरी प्रत्यक्षात महामार्गाचे काम मात्र धिम्या गतीने सुरू आहे. यामुळे महामार्गावर अपघातांची मालिका सुरुच असून वाहतूक कोंडीचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे. तरीही प्रशासन अजूनही सुस्तच आहे. या पार्श्वभूमीवर शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी समितीने ७ डिसेंबरपासून ’एल्गार’ पुकारला आहे. २७, २८ डिसेंबर रोजी लांजा-हातखंबा, ३ व ४ जानेवारी रोजी हातखंबा-संगमेश्वर, १० व ११ जानेवारी रोजी सावर्डे-संगमेश्वर येथे तिरडी आंदोलन छेडून शासनाचा निषेध नोंदवण्यात येणार आहे.www.konkantoday.com




