
पद्मभूषण सुमित्राताई महाजन यांच्या हस्ते श्री क्षेत्र टेरव देवस्थान दिनदर्शिका प्रकाशन सोहळा संपन्न.
चिपळूण: श्री क्षेत्र टेरव, श्री कुलस्वामिनी भवानी वाघजाई देवस्थान २०२६ दिनदर्शिकेचा प्रकाशन व लोकार्पण सोहळा, कोकणातील चिपळूणच्या सुकन्या पद्मभूषण, सतत आठ वेळा इंदूर येथून खासदार निवडून आलेल्या तसेच बिनविरोध निवड झालेल्या लोकसभेच्या मा.अध्यक्षा सुमित्राताई महाजन यांच्या शुभहस्ते नुकताच दादर मुंबई येथे ब्राह्मण सेवा मंडळातर्फे त्यांना ब्रह्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आल्यानंतर दिमाखात संपन्न झाला. सदर प्रसंगी सुप्रसिद्ध शास्त्रीय संगीतकार, गायिका पद्मश्री पद्मजा फेणाणी जोगळेकर, मा. खासदार व भारतीय सांस्कृतिक सबंध परिषदेचे अध्यक्ष विनय सहस्रबुद्धे तसेच ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी आणि समाजवादी नेते कै. प्रकाशभाई मोहाडीकर यांच्या सुकन्या महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज आणि कृषीच्या पहिल्या महिला अध्यक्षा मीनलताई मोहाडीकर हे मान्यवर उपस्थित होते. सुमित्राताईंना श्री सिद्धिविनायक मंदिराचे महावस्त्र व प्रसाद भेट देण्यात आला. चिपळूणच्या माहेरवाशिणी, पर्यावरण प्रेमी, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जीवनावर मातोश्री हे पुस्तक लिहिणाऱ्या, तसेच इंदूर शहरास गेले अनेक वर्षे देशाचा स्वच्छ शहराचा प्रथम पुरस्कार ज्यांचे योग्य नियोजन, कल्पकता व अंमलबजावणीमुळे प्राप्त झाले त्या पद्मभूषण, मा. लोकसभा अध्यक्षा सुमित्राताई महाजन यांना श्री क्षेत्र टेरव देवस्थान भेटीचे निमंत्रण या वेळी देण्यात आले.
गेली १६ वर्षे भाविक व ग्रामस्थांना देवस्थानची आकर्षक, दर्जेदार व परिपूर्ण दिनदर्शिका भेट देण्यात येत आहे. सालाबादप्रमाणे या वर्षीही दिनदर्शिकेला वाढती मागणी आहे. श्री क्षेत्र टेरव गावातील सर्व ग्रामस्थ तसेच मुंबई, पुणे, ठाणे, सुरत, बडोदा, वापी इ. शहरात वास्तव्यास असलेले टेरववासीय, माहेरवाशिणी, भाविक, सगे सोयरे, शुभचिंतक, देणगीदार यांना सदर दिनदर्शिकेचे वितरण करण्यात येणार आहे.
देवस्थानात तसेच टेरव गावात साजरे होणारे सार्वजनिक सण, उत्सव व इतर सर्व धार्मिक कार्यक्रमांची माहिती दिनदर्शिकेत समाविष्ट करण्यात आली आहे.




