
ज्येष्ठ अभिनेत्री सुहास जोशी यांना ‘गदिमा’ पुरस्कार, तर नागराज मंजुळे यांना चैत्रबन पुरस्कार
‘गदिमांची गाणी गात गात आम्ही मोठे झालो. ते महान होते. गदिमा अमर आहेत आणि अमरच राहतील,’ अशी भावना ज्येष्ठ अभिनेत्री सुहास जोशी आणि ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांनी रविवारी ‘गदिमा स्मृती समारोहा’त व्यक्त केली.
गदिमा प्रतिष्ठानतर्फे ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांच्या हस्ते ज्येष्ठ अभिनेत्री सुहास जोशी यांना ‘गदिमा पुरस्कारा’ने गौरविण्यात आले, तर प्रसिद्ध लेखक-दिग्दर्शक नागराज मंजुळे यांना चैत्रबन पुरस्कार, वंदना रवींद्र गांगुर्डे यांना गृहिणी-सखी-सचिव पुरस्कार आणि गायिका मुग्धा वैशंपायन यांना विद्या-प्रज्ञा पुरस्कार प्रदान करण्यात आला. तसेच गदिमांच्या साहित्यावर पहिला प्रबंध सादर करणाऱ्या डॉ. श्रीपाद जोशी यांचा विशेष सन्मान करण्यात आला. याच कार्यक्रमात आनंद माडगूळकरलिखित ‘माझ्या खिडकीतून गदिमा’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष मिलिंद जोशी, प्रकाशक सुधाकर जोशी, प्रतिष्ठानचे कार्यकारी विश्वस्त आनंद माडगूळकर आदी उपस्थित होते.
‘मामा पु. बा. भावे यांच्यामुळे गदिमांचा सहवाद लाभला. गदिमा खऱ्या अर्थाने ‘ग्रेट’ होते. ते आवडतात. त्यांची गाणी आवडतात. त्यांची गाणी गात गातच आम्ही लहानाचे मोठे झालो. ते अमर आहेत. अमरच राहतील,’ अशी भावना मोहन जोशी यांनी व्यक्त केली.
‘गदिमांनी आमच्या पिढीला सुसंस्कृतपणा दिला. आमच्या काळात कोणीही यायचे आणि गाणी म्हणून दाखव म्हणायचे, तेव्हा गदिमांची गाणी गायचो. त्यांची गाणी सगळ्यांना आवडायची. काम करत असताना प्रचंड अभ्यास गरजेचा असतो. ग. दि. माडगूळकरांना महाराष्ट्रातील कित्येक बोली सहज अवगत होत्या. गदिमांच्या गाण्यातील गोडी, त्यातील शब्द आजही पोहचवू आठवतात. नव्या पिढीलाही ते गाऊ वाटतात, याचा अत्यंत आनंद वाटतो. गदिमा अमर आहेत आणि ते अमरच राहतील,’ अशा शब्दांत सुचेत्रा जोशी यांनी गदिमांविषयी कृतज्ञता व्यक्त केली.
पुरस्कार विजेत्यांनी मनोगत व्यक्त केले. उत्तरार्धात गदिमांचे कनिष्ठ बंधू आणि ज्येष्ठ कवी अंबादास माडगूळकर यांच्या स्मरणार्थ ‘वंद्य वंदे मातरम’ हा गदिमा गीतांचा कार्यक्रम स्वरानंद प्रतिष्ठानच्या कलाकारांनी सादर केला. राजेश दामले यांनी सूत्रसंचालन केले. प्रतिष्ठानचे विश्वस्त प्रकाश भोंडे यांनी आभार मानले.
‘गदिमांसारख्या मोठ्या माणसाच्या नावाने पुरस्कार मिळेल असे वाटले नव्हते. सुरवातीला मी कविता वाचायला, लिहायला लागलो. तेव्हा गदिमा, व्यंकटेश माडगूळकर यांच्याबद्दल समजले. त्यांचे बोट धरून मी चालत होतो,’ नागराज मंजुळे यांनी सांगितले



