
गोगटे-जोगळेकर महाविद्यालयात शोधवेध संशोधन स्पर्धा संपन्न
रत्नागिरी : दरवर्षीप्रमाणे यावर्षी गोगटे-जोगळेकर महाविद्यालयात (स्वायत्त) शोधवेध संशोधन स्पर्धा संपन्न झाली. ही स्पर्धा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना संशोधनास प्रोत्साहित करण्यासाठी दरवर्षी आयोजित केली जाते. गेली अनेक वर्ष या स्पर्धेचे यशस्वीरित्या आयोजन महाविद्यालयात केले जात आहे. यातून शास्त्रशुद्धरित्मा संशोधन कसे करावे याबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले जाते. सर्व विद्याशाखेतील विद्यार्थी पदवी आणि पदव्युत्तर स्तरावर सहभागी होतात. शोधवेध स्पर्धा ही विद्यापीठाच्या अविष्कार संशोधन स्पर्धेतील विद्यार्थ्यांच्या सहभागास प्रोत्साहन देते.
यावर्षी २५ नोव्हेंबर रोजी महाविद्यालयातील डॉ. ज. शं. केळकर सेमिनार हॉल येथे ही स्पर्धा संपन्न झाली. या स्पर्धेत तीनही विद्याशाखेच्या विद्यार्थ्यांनी आपले प्रकल्प सादर केले. कला शाखेतून आठ, वाणिज्य शाखेतून नऊ आणि विज्ञान शाखेतून अठ्ठावीस प्रकल्प स्पर्धेत सादर झाले. विद्यार्थ्यांनी पोस्ट प्रेसेंटेशनच्या माध्यमातून या प्रकल्पांचे सादरीकरण केले.
स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांनी विद्यार्थ्यांना संशोधनास उपयुक्त मार्गदर्शन केले. संशोधन हे समाज उपयुक्त आणि कालसंगत असावे असे प्राचार्यांनी आपल्या मनोगतात सांगितले. उद्घाटन कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्रशासकीय उपप्राचार्य डॉ. सुरेंद्र ठाकूरदेसाई, कला शाखा उपप्राचार्या डॉ. कल्पना आठल्ये, वाणिज्य शाखा उपप्राचार्या डॉ. सीमा कदम आणि विज्ञान शाखा उपप्राचार्या डॉ. अपर्णा कुलकर्णी उपस्थित होत्या. शोधवेध संशोधन स्पर्धेत कला शाखेकडून डॉ. सुरेंद्र ठाकूरदेसाई, डॉ. चित्रा गोस्वामी वाणिज्य शाखेकडून डॉ. सीमा कदम, डॉ. अजिंक्य पिलणकर, विज्ञान शाखेकडून डॉ. मधुरा मुकादम, डॉ. स्वामीनाथन भट्टर, प्रा. रश्मी भावे, डॉ. विराज चाबके यांनी परीक्षणाचे कार्य केले. संपूर्ण स्पर्धेचे आयोजन हे रिसर्च क्लब समन्वयक डॉ. अजिंक्य पिलणकर आणि रिसर्च क्लब सदस्म यांनी केले होते. प्रा. मोहिनी बामणे यांनी या संपूर्ण स्पर्धेचे सूत्रसंचलन केले.




