
आंबोलीत कारसह दीड लाखाची गोवा दारू जप्त
पोलिसांनी गस्त घालत केलेल्या कारवाईत गोवा दारूसह क्रेटा कार असा एकूण 13 लाख 44 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. कारवाईवेळी गाडीतील दोन अनोळखी संशयित अंधाराचा फायदा घेऊन जंगलात पळून जाण्यात यशस्वी झाले असून, त्यांच्या विरोधात सावंतवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.आंबोली पोलिस शनिवारी रात्री 8.45 वा. च्या सुमारास चौकुळ ते कुंभवडेदरम्यान रात्री गस्त घालत होते. या गस्तीदरम्यान हवालदार मनीष शिंदे आणि गौरव परब हे केगदवाडी चौकुळ- कुंभवडे रस्त्यावर उभे होते. याचदरम्यान, केगदवाडी येथे सांगली पासिंगची एक क्रेटा कार संशयास्पद आढळून आली. त्यांनी सदर गाडी थांबवण्याचा प्रयत्न केला, मात्र, पोलिसांनी पाहून कार चालकाने गाडी रिव्हर्स घेऊन अंधारात थांबवली. यावेळी चालक आणि त्याच्यासोबत असलेला अन्य एक इसम असे दोघेही तत्काळ गाडीतून उतरून अंधाराचा व दाट जंगलाचा फायदा घेऊन पसार झाले. पोलिसांनी या संशयास्पद वाहनाची तपासणी केली असता, वाहनामध्ये गोवा दारूचे 12 बॉक्स आढळून आले. या दारूची किंमत रु.1 लाख 44 हजार असून, क्रेटा गाडीची किंमत रु.12 लाख इतकी आहे. अशाप्रकारे पोलिसांनी एकूण रु.13 लाख 44 हजार रु. किमतीचा मुद्देमाल जप्त केला .
याप्रकरणी सावंतवाडी पोलिस ठाण्यात रात्री उशिरादोन पसार अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.




