
रखडलेल्या चिपळूण बसस्थानकाच्या दुसर्या टप्प्याच्या वाढीव साडेतीन कोटीच्या निधीला लवकरच मंजुरी
चिपळूण येथील रखडलेल्या बसस्थानकाच्या दुसर्या टप्प्यातील वाढीव साडेतीन कोटीच्या निधीला लवकरच मंजुरी दिली जाईल, असे आश्वासन गुरुवारी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आमदार शेखर निकम यांना दिले. तसेच संबंधित प्रक्रियेला गती देण्यासाठी परिवहन महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकांना या प्रश्नी तातडीने कार्यवाही करून अहवाल सादर करण्याच्या सूचनाही दिल्या.
गेल्या ८ वर्षांपासून चिपळूण बसस्थानकाचे काम रखडले आहे. अनेकांनी आंदोलने केल्यानंतरही कोणतीच कार्यवाही होत नव्हती. अशातच आमदार शेखर निकम यांनी परिवहन मंत्री सरनाईक यांच्याकडे केलेल्या पाठपुराव्यानंतर बसस्थानकाला २ टप्प्यात निधी देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार पहिल्या टप्प्यात २ कोटी ८७ लाखाची तरतूद करण्यात आली. मात्र पुढील वाढीव साडेतीन कोटीच्या निधीची तरतूद होत नसल्याने पुढील कामांचे सारेच घोडे अडले. या प्रकरणी परिवहन विभागाच्या मुंबईत येथील कार्यकारी अभियंता यांच्याकडून रखडलेल्या मध्यवर्ती बसस्थाकाबरोबरच शिवाजीनगर बसस्थानक कामासाठी प्रत्येक साडेतीन कोटी याप्रमाणे ७ कोटीचे अंदाजपत्रक तयार करून प्रशासकीय मान्यतेसाठी एसटीच्या बांधकाम महाव्यवस्थापकांकडे गेल्याच नोव्हेंबर महिन्यात पाठवले होते. दरम्यान, बसस्थानकाच्या वाढीव निधीबाबत पुढील कार्यवाही होत नसल्याने आमदार निकम यांनी महामंडळाकडे सातत्याने पत्रव्यवहार केला. यातूनच निकम यांनी गुरुवारी नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात मंत्री सरनाईक यांची भेट घेऊन चर्चा केली. तसेच वाढीव निधीयावत निवेदनही दिले.www.konkantoday.com




