
दापोली तालुक्यातील मौजे साकळोली येथील निसर्ग नर्सरी परिसरात दोन कारची समोरासमोर धडक
दापोली तालुक्यातील मौजे साकळोली येथील निसर्ग नर्सरी परिसरात शुक्रवार, दि. १२ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास दोन कारमध्ये समोरासमोर जोरदार धडक होऊन भीषण अपघात झाला. या अपघातात दोन्ही वाहनांतील चालक व प्रवासी जखमी झाले असून दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
दापोली पोलीस ठाण्यात दाखल तक्रारीनुसार, आपटी मधलीवाडी (ता. दापोली) येथील रहिवासी सुरज संतोष कदम हे इको कारमधून प्रवास करत होते. इको कार चालक नितीन दत्ताराम रांगले (रा. बोरघर) हे आपटी ते गावतळे या मार्गावरून वाहन चालवत असताना, समोरून गावतळे दिशेने येणाऱ्या होंडा कारने भरधाव वेगात व निष्काळजीपणे वाहन चालवत इको कारला समोरून जोरदार धडक दिली.
ही होंडा कार (क्रमांक MH-43 BN-2677) आर्यन गणेश निकम (वय २१, रा. जुईनगर, नवी मुंबई) यांच्या ताब्यात होती. चालकाच्या निष्काळजी व धोकादायक वाहन चालवण्यामुळेच हा अपघात झाल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
या अपघातात दोन्ही वाहनांतील चालक व प्रवासी जखमी झाले असून त्यांना तत्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघातामुळे दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.



