
६४ वी राज्यस्तरीय हौशी नाट्य स्पर्धेत समर्थ रंगभूमीचे अग्निपंख नाटक प्रथम
मिनार गजानन पाटील (रावसाहेब), ऋचा मुकादम (बाईसाहेब) रौप्यपदकाचे मानकरी
रत्नागिरी इतिहासात प्रथमच नाटकाच्या स्पर्धेत दिली जाणारी सर्वच्या सर्व ९ प्रथम पारितोषिके प्राप्त करत समर्थ रंगभूमीने इतिहास घडविला
रत्नागिरी : महाराष्ट्र शासनाच्या ६४ व्या राज्यस्तरीय हौशी नाट्य स्पर्धेत रत्नागिरी मधील समर्थ रंगभूमीचे, ज्येष्ठ नाटककार प्र. ल. मयेकर लिखित आणि युवा दिग्दर्शक ओंकार पाटील दिग्दर्शित अग्निपंख नाटकाने स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावत यशाची पताका फडकावली आहे. तसेच नाटकातील रावसाहेबाची दमदार भूमिका करणाऱ्या मिनार गजानन पाटील आणि बाईसाहेब ही भूमिका साकारणाऱ्या ऋचा मुकादम यांना उत्कृष्ट अभिनयाचे प्रथम क्रमांकाचे रौप्यपदक प्राप्त झाले आहे.
यासोबतच रत्नागिरी जिल्ह्याच्या आजवरच्या इतिहासात प्रथमच अशा प्रकारच्या स्पर्धेत नाटक प्रकारातील विविध वैयक्तिक तब्बल नऊ प्रथम पारितोषिके प्राप्त करत या नाटकाने विक्रम प्रस्थापिक केला आहे..
ही नाट्य स्पर्धा रत्नागिरी जिल्ह्यातील स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृहात मागील महिनाभर यशस्वीपणे पार पडली. अनेक प्रकारची नाटके यामध्ये सादर झाली. मात्र रसिकांच्या पसंतीस समर्थ रंगभूमीचे अग्निपंख हे नाटक उतरले होते. रसिकांनी यातील रावसाहेब आणि बाईसाहेब या दोन्ही भूमिकांना प्राधान्य दिले होते. आणि आता हेच नाटक परीक्षकांच्या नजरेतुन सर्वोच्च गुण मिळवीत यशस्वी झाले आहे.
या स्पर्धेत अग्निपंख नाटकाला पुढील पारितोषिके प्राप्त झाली आहेत.
प्रथम क्रमांक नाटक – अग्निपंख
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक – ओंकार पाटील
सर्वोत्कृष्ट प्रकाशयोजना – साई सिर्सेकर
सर्वोत्कृष्ट नेपथ्य – प्रवीण धुमक
सर्वोत्कृष्ट रंगभूषा – उदयराज तांगडी
सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शन – ओंकार बंडबे
सर्वोत्कृष्ट वेशभूषा – चैताली पाटील
या सर्वांना प्रथम क्रमांक प्राप्त होऊन अग्निपंख नाटकातील मुख्य भूमिकेत असलेल्या मिनार गजानन पाटील यांनी आपल्या कसलेल्या अभिनयाच्या जोरावर अत्यंत चुरशीच्या स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवित यश संपादन केले आहे. त्यांच्या या सर्वांच्या यशाबद्दल समर्थ रंगभूमी रत्नागिरीचे, दिग्दर्शक ओंकार पाटील, अभिनेता मिनार गजानन पाटील, अभिनेत्री ऋचा मुकादम आणि समर्थ रंगभूमीचे श्रीकांत पाटील, अजित पाटील यांच्यासह सर्व सहकाऱ्यांचे सर्वच स्तरातुन अभिनंदन करण्यात येत असून, स्पर्धेच्या पुढील राज्यस्तरीय टप्प्यासाठी शुभेच्छा व्यक्त करण्यात येत आहे.




