
रेबीजचा रुग्ण? तरुणाचा रस्त्यात धुडगूस, कुत्र्यासारखा चावू लागला, साताऱ्यातील भयावह प्रकार!
सातारा : सकाळची वेळ… विद्यार्थ्यांची शाळेत, नोकरदारांची ऑफिसला जाण्याची गडबड अन् लोकांची तालुक्याला जाण्यासाठी धावपळ सुरु असतानाच साताऱ्यातील अंगापूर फाट्याजवळ भयावह प्रकार घडला. रस्त्यावर एका मनोरुग्णाने धुमाकूळ घालत रस्ता ठप्प केला, ज्यामुळे नागरिकांची एकच तारांबळ उडाली, तब्बल एका तासानंतर या मनोरुग्णाला जाळे टाकून पकडण्यात आले. नेमकं काय घडलं? वाचा…
मनोरुग्णाचा धुमाकूळ…
याबाबत सविस्तर माहिती अशी की, साताऱ्यातील अंगापूर फाट्याजवळ रस्त्यावर एका मनोरुग्ण व्यक्तीचा धुडगूस पाहायला मिळाला. गोपाल असे या व्यक्तीचे नाव असून तो ऊसतोड मजुरांच्या टोळीतील असल्याचं सांगण्यात येत आहे. त्याला दवाखान्यात घेऊन जात असतानाच त्याने सोबत असलेल्या दुचाकी चालकाला चावा घेतला आणि रोडवर इकडे- तिकडे धावू लागला.
तो रस्त्यावरील येणाऱ्या जाणाऱ्या लोकांच्या अंगावर धावून जात होता. दोन पाय आणि दोन हातावर प्राण्यासारखे चालत असल्यामुळे या व्यक्तीला रेबीज झाला असावा अशी चर्चा सर्वत्र पसरू लागली. भररस्त्यात हा प्रकार सुरु असल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले होते.
जाळे टाकून पकडले…
मनोरुग्णाच्या भितीने दोन्ही बाजूंची वाहतूकही ठप्प झाली. काही तरुणांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला, मात्र तो अंगावर धावून येत होता, चावा घेत होता. शेवटी काही नागरिकांनी जाळी आणून त्याला पकडले, त्याचे हातपाय मोठ्या दोरीने बांधून त्याच्यावर नियंत्रण मिळवले. त्यानंतर त्याला स्थानिक लोकांनी पकडून जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.
दरम्यान, डॉक्टरांनी संबंधित व्यक्तीची तपासणी केली यानंतर हा व्यक्ती मनोरुग्ण असल्याचे प्राथमिक डाॕक्टरांकडून सांगितले जात आहे. सध्या त्याला एका बंद आयसोलेशन वार्ड मध्ये ठेवण्यात आले आहे. अधिक उपचारानंतरच या रोगाचे खरे कारण समोर येईल.




