
मी राज्यमंत्री असताना माझ्या अपॉईंटमेंटसाठी तासन् तास बसणारे फडणवीस आता साधा निधीही देत नाहीत – आ. भास्कर जाधव संतापले.
मी राज्यमंत्री असताना हेच देवेंद्र फडणवीस माझ्या अपॉईंटमेंटसाठी तासनतास माझ्या बंगल्यावर बसत होते आणि आता मुख्यमंत्री झाल्यावर त्यांच्याकडे विकास कामांसाठी एखादे पत्रही घेऊन जाऊ शकत नाही अशी परिस्थिती आहे. विकास कामांसाठी निधी सोडाच सभागृहात साधे बोलूही दिले जात नाही. विरोधकांना अतिशय तुच्छ वागणूक दिली जाते. हा सारा प्रकार लोकशाहीसाठी अत्यंत मारक आहे, अशा स्पष्ट शब्दात ठाकरे गटाचे आ. भास्कर जाधव यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना आपला संताप व्यक्त केला.
नागपूर अधिवेशनादरम्यान पत्रकारांशी बोलताना आ. जाधव यांनी मुख्यमंत्र्याच्या अभ्यासू वृत्तीचे मुक्तकंठाने कौतुकही केले. अजित पवार यांची प्रशासनावर उत्तम पकड आहे आणि ते प्रचंड काम करतात असा अभिप्राय त्यांनी दिला तर एकनाथ शिंदे यांना ठाण्यापलीकडे कोण ओळखत होतं? पक्ष फोडून मुख्यमंत्री झाल्यानंतर राज्यात त्यांची ओळख झाली असे परखड मत त्यांनी नोंदवले. या सरकारकडे सभ्यता नावाला शिल्लक नाही. विरोधकांची गळचेपी सुरू आहे. यापूर्वी विरोधक म्हणून देवेंद्र फडणवीस यांना सभागृहात तासनतास बोलू दिले जात होते. कॉंग्रेसने विरोधकांनाही सन्मानाची वागणूक दिली होती. मात्र फडणवीस सरकारला या सार्या गोष्टींचे विस्मरण झाले आहे, असा शाब्दिक हल्ला त्यांनी चढवला.www.konkantoday.com




