अभ्यंकर – कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयाचा “छंदोत्सव” १५ डिसेंबरपासून

रत्नागिरी : र. ए. सोसायटीच्या अभ्यंकर- कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या विविध गुणांचा विकास होण्यासाठी राबविण्यात येणारा अभ्यासोत्तर उपक्रमांचा मानबिंदू असणारा ‘छंदोत्सव’ १५ ते २४ डिसेंबर या कालावधीत रंगणार आहे. १८ डिसेंबर रोजी वार्षिक क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन होईल. सलग ४ दिवस सांघिक व वैयक्तिक इनडोअर व आउटडोर क्रीडा स्पर्धांची प्राथमिक फेरी संपन्न होईल.
अभ्यासाबरोबरच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा या दृष्टिकोनातून दरवर्षी छंदोत्सवाचे आयोजन केले जाते. ‘छंदोत्सव म्हणजे विविध छंदांनी नटलेला उत्सव.’.. अभ्यासक्रमाच्या पलीकडे विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना व कौशल्यांना व्यासपीठ निर्माण करून देणारा विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रात पदार्पणाची संधी देणारा त्याच बरोबर सर्जनशीलतेचे सप्तरंग विद्यार्थ्यांमध्ये वृद्धिंगत करणारा हा युवा उत्सव आहे.
महाविद्यालयाने राबविलेल्या या उपक्रमातून विद्यार्थ्यांमधील कला, क्रीडा, नृत्य, अभिनय, नाद, लय, ताल आणि शब्द या अष्टगुणांना मुक्त व्यासपीठ मिळते आणि विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व फुलते. यामुळे महाविद्यालयामध्ये अनेक प्रतिभावंत कुशल विद्यार्थी तयार होतात. कनिष्ठ महाविद्यालयाने राबविलेल्या छंदोत्सव कार्यक्रमाचे हे फलित आहे. विद्यार्थ्यांसाठीचा हा उपक्रम सलग अठरा वर्ष महाविद्यालयात अविरतपणे सुरू आहे.
छंदोत्सवातील विविध उपक्रमांची थोडक्यात रूपरेषा अशी : २१ डिसेंबर रोजी दुपारी २ वाजता विद्यार्थ्यांनी साकारलेल्या विविध प्रदर्शनांचे उद्घाटन होणार आहे. यामध्ये फोटोग्राफी स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, विविध हस्तकला स्पर्धा व फूड स्टॉल याचे उद्घाटन करून कार्यक्रमास सुरुवात होईल. त्याच दिवशी दुपारी ३ वाजता जवाहर क्रीडांगण येथून भव्य “शोभायात्रा” काढण्यात येईल तसेच दुपारी ४ वाजता छंदोत्सव उद्घाटन व फॅन्सी ड्रेस स्पर्धांचे मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन होईल. सायंकाळी ५ वाजता शामराव करंडक एकांकिका स्पर्धा उद्घाटनाचा कार्यक्रम होईल आणि स्पर्धा सादरीकरणाला प्रारंभ होईल. एकांकिकेसाठी ‘शब्द एक अविष्कार अनेक’ हे सूत्र असलेल्या या स्पर्धेकरिता “नातीगोती” हा शब्द देण्यात आला आहे. २० रोजी सकाळी ११ वाजता घंटानाद सन्मान प्रदान केला जाईल आणि गीत गायन स्पर्धेने कार्यक्रमाची सुरुवात होईल. दुपारी १२ वाजता एकल नृत्य स्पर्धा विविध गुणदर्शन कार्यक्रम होतील आणि सायंकाळी ४ वाजता सर्व स्पर्धांमधील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते गौरव चिन्ह व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात येईल.
२२ ते २४ डिसेंबरपर्यंत सर्व क्रीडा प्रकाराचे मैदानी सामने पार पडतील. सायंकाळी ४.३० वाजता वार्षिक क्रीडा स्पर्धेतील स्पर्धकांना गौरव चिन्ह व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात येईल. छंदोत्सवांमध्ये अनेक विद्यार्थी सहभागी होऊन स्वतः मधील विविध कौशल्यांचा अविष्कार घडवितात आणि याच व्यासपीठावरून पुढे जात विद्यापीठ स्तर व राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये यश प्राप्त करतात.
वार्षिक स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम यशस्वीपणे व नियोजनबद्ध पार पाडण्यासाठी र. ए. सोसायटीचे सर्व संस्था पदाधिकारी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर, उपप्राचार्य प्रा. सुनील गोसावी, छंदोत्सव प्रमुख प्रा. मकरंद दामले तसेच आर्ट्स, कॉमर्स, वाणिज्य, एमसीव्हीसी शाखांचे विभाग प्रमुख व छंदोत्सवासाठी स्थापन केलेल्या शिक्षकांच्या विविध समित्या यामध्ये स्वागत समिती, बक्षीस वितरण समिती, प्रसिद्धी समिती, सूत्रसंचालन समिती, शोभायात्रा समिती, रंगमंच समिती विविध प्रदर्शन समिती निमंत्रण समिती गीत गायन समिती, नृत्य स्पर्धा समिती, तंत्रज्ञान सहाय्यता समिती, फॅन्सी ड्रेस व विविध फिलर्स समिती, फूड फेस्ट समिती आणि क्रीडा समिती इत्यादींच्या उत्कृष्ट नियोजनामुळे हा उत्सव उत्साहपूर्णरित्या संपन्न होणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button