
रत्नागिरी जिल्ह्यात थंडीचा जोर वाढला, आंबा बागायतदारांच्यात उत्साह
काही दिवसांपासून उन्हाची तीव्रता जाणवत असताना, मागील दोन दिवसांपासून रत्नागिरीसह परिसरात पुन्हा एकदा थंडीने जोर पकडला आहे. नोव्हेंबर महिन्याच्या पंधरवड्यानंतर थंडीचे आगमन झाले होते, मात्र डिसेंबरच्या सुरुवातीपासून दिवसाच्या वेळी उष्णतेचा अनुभव येत होता. आता तापमानात झालेल्या घसरणीमुळे वातावरणात गारवा जाणवत आहे. मंगळवारी रत्नागिरीचे दिवसभरातील कमाल तापमान २६ अंश सेल्सिअस नोंदवले गेले.
संध्याकाळच्या वेळी विशेषतः थंडावा जाणवत असून, नागरिकांनी उबदार कपड्यांचा वापर पुन्हा सुरू केला आहे. थंडी वाढल्यामुळे आंबा उत्पादक बागायतदारांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. हापूस आंब्याच्या कलमांना मोहोर येण्यासाठी थंडीची आवश्यकता असते. गेले काही दिवस तापमान वाढले होते, त्यामुळे मोहोर प्रक्रियेवर परिणाम होण्याची भीती व्यक्त होत होती. मात्र, आता वाढत्या कडाक्यामुळे आंब्याला मोहोर चांगल्या प्रमाणात येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. काही आंबा उत्पादकांनी सांगितले की ’डिसेंबर-जानेवारीतील स्थिर थंडी मिळाल्यास हापूसच्या गुणवत्तेत मोठी वाढ होते.
www.konkantoday.com




