
ओणी येथे वात्सल्य मंदिरचा आनंद मेळावा उत्साहात
राजापूर : तालुक्यातील ओणी येथे वात्सल्य मंदिर यांच्या सौजन्याने आयोजित केलेला आनंद मेळावा उत्साहात पार पडला. रत्नागिरी जिल्ह्यातील विविध बालगृहांमधील एकूण १४२ मुला–मुलींनी या मेळाव्यात सहभाग घेतला.
मेळाव्याचे उद्घाटन बालगृहातील मुलांच्या हस्ते झाडाला पाणी घालून करण्यात आले. तसेच संस्थाध्यक्ष डॉ. महेंद्र मोहन व संचालक मंडळींच्या हस्ते साने गुरुजी, महात्मा जोतिबा फुले, सावित्रीबाई फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, इंदिरा हळबे, मंजूताई भिडे यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करण्यात आले.
सांस्कृतिक कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्र सेवा दलाचे महामंत्री बाबासाहेब नदाफ यांच्या “जग हे सुंदर आहे” या गीताने झाली. त्यांना गोवा येथील सेवा दलाचे कार्यकर्ते बाबनी मापारी यांनी साद दिली. “आम्ही भारताचे लोक” या थीमवर आधारित नृत्य, पथनाट्य आणि समुहगीतांनी वातावरण भारून गेले.
रत्नागिरीचे कुणाल पाटील यांनी स्त्रीवेषातील लावणीने प्रेक्षकांची मने जिंकली. माजी विद्यार्थी महेशकुमार यांनी सादर केलेले वासुदेव नृत्य विशेष दाद मिळवून गेले. नरेश कांबळे यांनी पोस्टमनच्या वेषात “मी वात्सल्य मंदिर बोलतोय…” हे पत्रवाचन सादर केले.
तत्पूर्वी, ७१ वेळा रक्तदान केल्याबद्दल महेशकुमार, गणेश कुडगावकर (३२ वेळा रक्तदान), पत्रकार राजन चव्हाण (३१ वेळा रक्तदान) तसेच डॉ. मयुरेश साखळकर यांच्या वैद्यकीय सेवेला सन्मानित करण्यात आले. याचबरोबर लावणी सम्राज्ञी कुणाल पाटील, सामाजिक कार्यकर्त्या व मिसेस इंडिया रॉयल क्वीन अंकीता चौघुले-मोर्ये, तसेच जिल्ह्यातील सातही बालगृहातील अनेक वर्षे निष्ठेने कार्य करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा शाल व मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.
हा सन्मान तुषार-अनिता-अरविंद चौघुले यांच्या सौजन्याने देण्यात आला.
विविध स्पर्धांमध्ये पुढील विजेत्यांनी सुयश मिळवले. चित्रकला : स्वाती ताडे, वैशाली पवार, पूनम कांबळे.
घोषवाक्य : अलका वाघमारे, राधिका गुरव, अविनाश ठाकूर.
निबंध : स्वप्नील पवार, मनीष घाग, प्रतीक जोशी
सामूहिक भाऊबीज कार्यक्रमात सर्व बालगृहातील मुलांना स्वेटर भेट देण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बी. के. गोंडाळ यांनी केले. मेळावा यशस्वी करण्यासाठी संस्थाध्यक्ष डॉ. महेंद्र मोहन यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यवाह रूपेश रेडेकर, माजी विद्यार्थी, संचालक, कर्मचारी आणि वात्सल्य मंदिरचे विद्यार्थी यांनी विशेष मेहनत घेतली.
कार्यक्रमास आशाताई गुजर, नाना मुजुमदार, पोलीस उपनिरीक्षक अभय तेली, निवेदिता तेली, दर्शना मांडवकर, मुग्धा कुळ्ये, विनोद मिरगुले, प्रकाश वळंजू, गोकुळ कांबळे, विवेक जोगळेकर, अरविंद निगळे, जयश्री पहाडे, मनिषा शिंदे, अंकिता व विजय मोर्ये, तसेच सर्व संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.




