
चिपळूणचे सुपुत्र मिलिंद साठे यांची राज्याचे नवे महाधिवक्ता म्हणून निवड
राज्याचे महाधिवक्ता म्हणून मिलिंद साठे यांची निवड करण्यात आली आहे. वीरेंद्र सराफ यांनी काही महिन्यांपूर्वी महाधिवक्ता पदाचा राजीनामा दिल्याची माहिती समोर आली होती. पण महाधिवक्तापदी नव्या विधीतज्ज्ञांची निवड होत नाही तोपर्यंत काही महिने त्यांना जबाबदारी सांभाळण्याची विनंती सरकारकडून करण्यात आली होती. त्यानुसार वीरेंद्र सराफ हे महाधिवक्ता पदाची जबाबदारी पास्याडत होते.
दरम्यान, हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला रविवारी नागपुरात पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आला. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मिलिंद साठे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं. मिलिंद साठे यांचा विधी विभागात दांडगा अनुभव आहे. त्यामुळे राज्याला त्यांच्या अनुभवाचा चांगला फायदा होईल अशी भावना व्यक्त होत आहे.
मुंबई उच्च न्यायालयातील प्रख्यात वरिष्ठ वकील म्हणून ओळख असलेले डॉ. मिलिदं साठे हे कायद्यावरील सखोल अभ्यास, कायदेशीर प्रक्रियेवरील प्रभुत्व यासाठी ओळखले जातात.
याखेरीज त्यांनी मुंबई हायकार्ड असोसिएशनचे अध्यक्ष म्हणूनही काम केले आहे. त्यांना विज्ञान, कला, वित्त व व्यवस्थापन या विविध क्षेत्रांतील जाण असल्याने त्यांची विविध विषयांची कायदेशीर मांडणी अधिक व्यापक असल्याचे सांगितले जाते. जानेवारी २०२४ मध्ये कसबा पेठ मतदारसंघातील निधी गैरवापराच्या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने त्यांची न्यायालय मित्र म्हणून नियुक्ती केली होती. तसेच, विविध महत्त्वाच्या प्रकरणांत त्यांच्या तर्कशुद्ध व अभ्यासपूर्ण मांडणीची दखल न्यायमूर्तीसहित कायदेक्षेत्रात घेतली गेली आहे.
www.konkantoday.com




