
रत्नागिरी येथील कोकणनगर येथे गांजा अमली पदार्थ विक्री करणाऱ्या आरोपीला अटक
रत्नागिरी येथील कोकणनगर येथे गांजा या अमली पदार्थ विक्री करणाऱ्या एका इसमाला ताब्यात घेण्यात आले आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने ही धडक कारवाई केली असून, या प्रकरणी जवळपास ५० हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे.
रत्नागिरी जिल्ह्यामध्ये अमली पदार्थांना प्रतिबंध व कारवाई करण्याचे अनुषंगाने जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. नितीन दत्तात्रय बगाटे, अपर पोलीस अधीक्षक श्री. बी.बी. महामुनी यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेस सूचना दिल्या होत्या.
त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा रत्नागिरीचे पोलीस निरीक्षक श्री. नितीन ढेरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्था.गु.अ.शा चे पोलीस अधिकारी व अंमलदार हे दिनांक 08/12/2025 रोजी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याचे हद्दी मध्ये पेट्रोलींग करीत असताना कोकण नगर कब्रास्थानचे बाजूस असलेल्या मोकळया जागेत एक इसम हातात कॅरीबॅग घेवून उभा असलेला या पथकाला दिसला व त्याची हालचाल संशयास्पद वाटल्याने व त्याने तेथून पळून जाण्याचा प्रयत्न केला असता त्यास योग्य बळाने जागीच 14.30 वा. थांबविण्यात आले व दोन पंचांसमक्ष त्याला त्याचे नाव गाव विचारले असता त्याने आपले नाव रईस सईद खान वय 32 रा. घर नंबर 390, मराठी शाळेसमोर, कोकण नगर रत्नागिरी असे सांगितले.
या पथकामार्फत लागलीच रईस सईद खान याची दोन पंचांसमक्ष अंगझडती घेण्यात आली व या झडतीमध्ये त्याच्या ताब्यातील पिवळ्या रंगाच्या कॅरीबॅग मध्ये काळपट हिरवट रंगाचा पाने फुले बोडे काडया व बिया असलेला उग्रवासाचा (एकूण 204 ग्राम वजनाचा) “गांजा” सदृश्य अंमली पदार्थ असलेल्या 13 पारदर्शक प्लॅस्टीक पाऊच/पिशव्या एक डिजीटल वजन काटा व त्याच्या पॅन्ट च्या खिश्यामधून 2 मोबाइल फोन व ₹3,500 रोख रक्कम असा एकूण ₹49,700/- किमतीचा मुद्दे माल मिळून आला.
आरोपीत रईस सईद खान याने “गांजा” हा अंमली पदार्थ गैरकायदा विक्रीचे उद्देशाने आपल्या ताब्यात बाळगले स्थितीत मिळून आल्याने त्यास ताब्यात घेण्यात आलेले आहे व त्याच्या विरुद्ध रत्नागिरी शहर पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर नंबर 454/2025 एन.डी.पी. एस अॅक्ट 1985 चे कलम 8 (क), 20 (ब) ii (अ), अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या गुन्ह्याचा पुढील तपास रत्नागिरी शहर पोलीस ठाणे करीत आहे. ही कामगिरी मा. पोलीस अधीक्षक, रत्नागिरी श्री. नितीन दत्तात्रय बगाटे, अपर पोलीस अधीक्षक श्री. बी.बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. नितीन ढेरे व स. पो. नि, श्रीमती शबनम मुजावर, प्रभारी अधिकारी, महिला कक्ष, श्रेणी. पो. उनि. श्री. संदीप ओगले, पो. हवा/909 विजय आंबेकर, पो. हवा / योगेश नार्वेकर, पो. हवा / दिपराज पाटील यांनी केलेली आहे.




