
रत्नागिरीची दिव्या पाल्ये महाराष्ट्र संघात
राष्ट्रीय खो-खो स्पर्धेसाठी निवड ; सहायक प्रशिक्षक पदी ऐश्वर्या सावंत
रत्नागिरी : बंगळुरू (कर्नाटक) येथे ३१ डिसेंबर २०२५ ते ४ जानेवारी २०२६ या कालावधीत होणाऱ्या ४४ व्या कुमार-मुली राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेसाठी महाराष्ट्र राज्याचे कुमार व मुली गटाचे संघ जाहीर झाले आहेत. यामध्ये मुलींच्या संघात रत्नागिरीतील दिव्या पाल्ये, तर सहायक प्रशिक्षक पदी शिव छत्रपती पुरस्कार प्राप्त खेळाडू ऐश्वर्या सावंत यांची निवड झाली आहे. तसेच कुमार संघाच्या कर्णधार पदी धाराशिवचा राज जाधव, तर मुली संघाच्या कर्णधार पदी सांगलीची सानिका चाफे यांची निवड केली आहे.
अहिल्यानगर येथे पार पडलेल्या ५१ वी कुमार-मुली राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी स्पर्धेतून दोन्ही संघांची निवड करण्यात आली आहे. निवड समिती सदस्य श्रीनिवास मेतरी (रायगड), मनोज परदेशी (नंदुरबार), योगेश सोळसे (बीड) व राखी जोशी (पुणे) यांच्या उपस्थितीत निवड झालेल्या संघाची घोषणा महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे सरचिटणीस प्रा. डॉ. चंद्रजीत जाधव यांनी केली.
राष्ट्रीय पातळीवरील कठोर स्पर्धेचा विचार करून कुमार गटाचे शिबिर २२ ते २९ डिसेंबर सोलापूर येथे तर मुली गटाचे शिबिर धाराशिव येथे आयोजित केले जाणार आहे. या दोन्ही शिबिरातून संघाची रणनीती, फिटनेस व मनोधैर्य दृढ करण्यात येणार आहे.
महाराष्ट्राचे संघ पुढीलप्रमाणे : कुमार गट : राज जाधव (कर्णधार), जितेंद्र वसावे, हाराद्या वसावे, सोत्या वळवी, विशाल वसावे (सर्व धाराशिव), शंभूराज चंदनशिव, अरमान शेख, सिद्धार्थ माने-देशमुख (सर्व सोलापूर), श्री. दळवी, पार्थ देवकाते (सर्व सांगली), श्री. वसावे, आदेश पाटील (सर्व पुणे), तरबेज खान (सातारा), आशिष गौतम (ठाणे), ओमकार चव्हाण (अहिल्यानगर), राखीव : शंकर यादव (पुणे), समर्थ सावंत (मुं. उपनगर), लोकेश जाधव (सातारा), प्रशिक्षक : मोहन राजपूत (सोलापूर), सहायक प्रशिक्षक : सुजित माळी (लातूर), व्यवस्थापक : गणेश वारुळे (अहिल्यानगर).
मुली गट : सानिका चाफे (कर्णधार), श्रावणी तामखडे, विद्या तामखडे, सानिया सुतार (सर्व सांगली), धनश्री कंक, प्रणिती जगदाळे, दिक्षा काटेकर, श्रुती चोरमारे (सर्व ठाणे), मैथिली पवार, राही पाटील (सर्व धाराशिव), स्नेहा लामकाणे, प्राजक्ता बनसोडे (सर्व सोलापूर), निलम मोहंडकर (नाशिक), श्वेता नवले (पुणे), दिव्या पायले (रत्नागिरी), राखीव : कल्याणी लामकाणे (सोलापूर), सखुबाई चव्हाण (पुणे), सलोनी भोसले (सातारा), प्रशिक्षक : अभिजित पाटील (धाराशिव), सहा. प्रशिक्षक : ऐश्वर्या सावंत (रत्नागिरी), व्यवस्थापिका : उज्वला चेमटे (अहिल्यानगर).
राज्य संघात निवड झाल्याबद्दल दिव्या पाल्ये आणि सहायक प्रशिक्षक पदी निवड झाल्याबद्दल ऐश्वर्या सावंत हिचे रत्नागिरी जिल्हा खो-खो असोसिएशनतर्फे अभिनंदन करण्यात आले आहे. तिला प्रशिक्षक पंकज चवंडे यांच्यासह राज्य खो-खो असोसिएशनचे माजी सचिव संदिप तावडे, विनोद मयेकर यांचे मार्गदर्शन लाभले आहे.




