भगवद्गीता समुपदेशक, अनेक मार्ग दाखवणारी : डॉ. सुचेता परांजप

संस्कृत भारतीतर्फे आयोजित श्रीमद्भगवद्गीता पारायणाला अभूतपूर्व प्रतिसाद

रत्नागिरी : आधुनिक काळामध्ये जीपीएस ज्याप्रमाणे माणसाला एकाच ठिकाणी जाण्यासाठी वेगवेगळे मार्ग दाखवतो, त्याप्रमाणेच श्रीमद्भगवद्गीता ही माणसाला अनेक मार्ग दाखवते, आपण योग्य तो मार्ग निवडावा. तसेच गीता सर्वांचे समुपदेशन करते, असे प्रतिपादन डॉ. सुचेता परांजपे यांनी केले. संस्कृत भारती रत्नागिरीच्या वतीने गीता जयंतीनिमित्त आयोजित गीता पारायण करण्यात आले. त्यानंतर दैनंदिन जीवनातील गीता या विषयावर डॉ. परांजपे यांनी विस्तृत विवेचन केले.

रविवारी सायंकाळी माधवराव मुळ्ये भवन येथे गीताजयंतीनिमित्त झालेल्या कार्यक्रमामध्ये त्यांचे व्याख्यान झाले. या प्रसंगी सुमारे २०० गीताप्रेमी उपस्थित होते. या कार्यक्रमाचा प्रारंभ भारतमातेच्या व श्रीकृष्णाच्या प्रतिमापूजनाने आणि गीता पूजनाने झाला. संस्कृतभारतीचे विभाग संयोजक श्री मनोहर काजरेकर आणि ज्येष्ठ संस्कृत शिक्षिका व गीताव्रती सौ वंदना घैसास यांच्या हस्ते पूजन झाले. त्यानंतर संपूर्ण १८ अध्यायांचे पारायण सौ. योजना घाणेकर, सौ. किशोरी मोघे, सौ. अमृता आपटे आणि चिन्मयी सरपोतदार यांच्या नेतृत्वाखाली झाले. श्री. किशोर पावसकर आणि श्री. मोहन भिडे यांच्या हस्ते झालेल्या गीता आरतीने पारायणाची सांगता झाली.

व्याख्यान कार्यक्रमात गीताव्रतींचा सन्मान करण्यात आला. संपूर्ण गीता पाठ करून शृंगेरीच्या श्री शंकराचार्यांसमोर सादर करून आलेल्या सौ. अपर्णा जोशी, सौ. किशोरी मोघे, सौ. मीरा नाटेकर आणि सौ. अश्विनी जोशी यांचा सत्कार डॉ. सुचेता परांजपे यांच्या हस्ते करण्यात आला.

व्याख्यानात डॉ. सुचेता परांजपे यांनी गीतेतील तत्त्वज्ञान साध्या, सोप्या, सरळ भाषेत समजावून सांगितले आणि भगवद्गीतेचा दैनंदिन जीवनातील उपयोग करण्यासंबंधी माहिती अनेक उदाहरणातून सांगितली. त्या म्हणाल्या की, गीता प्रत्येक अध्यायात नवा विचार मांडते. भक्तिमार्ग, कर्ममार्ग, ध्यानमार्ग, ज्ञानमार्ग असे विविध मार्ग गीतेत सांगितले आहेत. यातील जो मार्ग तुम्हाला आवडेल, झेपेल, जमेल तो निवडावा. दैनंदिन जीवनात आपण छोट्या छोट्या गोष्टीत दुसऱ्याकडून अपेक्षा ठेवतो. तशा ठेवू नका, कर्म करत राहा. एखादी गोष्ट जाणून घेतल्याशिवाय आपल्याकडून कर्म होणार नाही. अलीकडे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी परदेशातून येणाऱ्या मान्यवरांना भगवद्गीता भेट देतात, हॉटेल्समध्येही वाचनासाठी भगवद्गीता वाचायला मिळते ही चांगली गोष्ट आहे.

गीतेचे वेगळेपण सांगताना त्या म्हणाल्या की गीतेची सुरुवात कथेने होते आणि कथेतून तत्त्वज्ञान सुरू होते. जगभरातील सर्वांनाच कथा आवडतात आणि त्यामुळे भगवद्गीता सर्व लोकांना आवडते. तसेच गीता भगवान श्री कृष्ण व अर्जुन यांचा संवाद असल्याने ती लवकर समजते व ती जिवंत वाटते. अशा अनेक कारणांमुळे गीता लोकप्रिय आहे.

संस्कृत भारतीच्या कोकण प्रांत अध्यक्ष डॉ. कल्पना आठल्ये, जिल्हाध्यक्ष डॉ. दिनकर मराठे आणि रत्नागिरी प्रमुख अक्षया भागवत मंचावर उपस्थित होत्या. डॉ. कल्पना आठल्ये यांनी डॉ. सुचेता परांजपे यांचा परिचय करून दिला. आशिष आठवले यांनी सूत्रसंचालन केले.

अध्यक्षीय भाषणात डॉ. दिनकर मराठे यांनी सांगितले की, भगवान श्रीकृष्ण व अर्जुन यांच्यातील संवाद असलेली गीता युद्धभूमीवर सांगितली गेली. त्यावेळी तिथे कोलाहल होता. बाहेर व मनातले द्वंद्व दूर करायला सद्सद्विवेक कळण्यासाठी गीता उपयोगी आहे.

आशिष आठवले यांनी संस्कृत भारतीची माहिती सांगताना संस्कृतभारती करत असलेल्या गीतेसंदर्भातील उपक्रमांची माहिती सांगितली. गीताजयंती निमित्त दररोज गीतेतील दोन श्लोक घरातील सर्वांनी मोठ्या आवाजात म्हणावेत आणि पुढील वर्षी गीतापारायणात सर्वांनी सहभाग घ्यावा असे आवाहन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button