
ज्यांनी सांभाळली सीमेची जबाबदारी त्यांच कुटुंब आपली जबाबदारीसशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलन शुभारंभप्रतिकुल परिस्थितीमध्ये राहून आपल्याला सुरक्षित ठेवणाऱ्या सैनिकांसाठी कृतज्ञता व्यक्त करण्याची अमुल्य संधी- मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे
रत्नागिरी, दि. 9 ) – सैनिक थंडी, वारा, ऊन किंवा अगदी गोठणबिंदू खाली तापमान असलेल्या ठिकाणी उंचीवर, खोलीवर बंकरमध्ये, समुद्राच्या खाली अशा ठिकाणी विपरीत परिस्थितीमध्ये राहून, आपल्याला सुरक्षित ठेवणाऱ्या सैनिकांसाठी एक कृतज्ञता व्यक्त करण्याची अमूल्य संधी आपल्याला मिळते. सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलनात सर्वांनी सहभागी होऊन त्या संधीचं सोनं करावं, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे यांनी केले.
जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाच्यावतीने सशस्त्र सेना ध्वजदिन 2025 निधी संकलनाचा शुभारंभ आज जिल्हा नियोजन समिती सभागृहात झाला. या प्रसंगी निवृत्त एअर मार्शल एच एम भागवत, अपर जिल्हाधिकारी भाऊ गलांडे, शिक्षणाधिकारी किरण लोहार, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अजिंक्य आजगेकर, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, निवृत्त कर्नल प्रशांत चतुर, कमांडर रामांजुल दीक्षित, महानगर गॅसचे आशिष प्रसाद, गौतम झा, अमित शिंदे, स्वामी स्वरुपानंद पतसंस्थचे स्वरुप देसाई, निवृत्त नाईक विजय थत्ते आदी उपस्थित होते.
मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती रानडे म्हणाल्या, मी सुद्धा एका माजी सैनिकांची सून आहे. जवान हा आयुष्यभर जवान असतो. आज माझे सासरे 82 वर्षाचे आहेत तरीसुद्धा रोज सकाळी उठल्यावर शेतात गेल्याशिवाय त्यांना करमत नाही. आयुष्यभर शिस्तप्रिय असणारं व्यक्तिमत्त्व म्हणजे सैनिकांचे व्यक्तिमत्त्व असतं
रत्नागिरी जिल्ह्याने 115 टक्के उद्दिष्ट साध्य केलं म्हणून सगळ्यांचे अभिनंदन करते. तुम्ही किती पैसे देता याला महत्त्व नाहीये. तर, तुम्ही सहभागी होता हे महत्त्वाचे आहे. प्रशासकीय सेवा देताना सेनादलातील व्यक्ती, त्यांचे कुटुंबिय यांची काही छोटी छोटी कामं आपल्याकडे असतात. आपण ही कामे शीघ्रतेने करुन सुद्धा आपल्या दृष्टीने अमूल्य योगदान देऊ शकतो. सैनिक माझी सैनिक त्यांचे कुटुंबीय किंवा वीर माता, वीर पत्नी किंवा त्यांची मुलं असतील जेव्हा विविध कामासाठी आपल्याकडे येतात तेव्हा सुद्धा आपला तो दृष्टिकोन हा केवळ या कार्यक्रमात न दिसता कामांमध्ये सुद्धा दिसला पाहिजे. सगळ्याच नागरिकांची आपण कामं करतोच परंतु, अधिक सजगतेने ही काम केली पाहिजेत. सहज आणि झटकन आपण जर करून दिली तर ती सुद्धा एक प्रकारे आपल्या कामातून आपण कृतज्ञता व्यक्त करू शकू.
निवृत्त एअर मार्शल श्री भागवत म्हणाले, देशाच्या सीमेचं संरक्षण करणे सैन्याचं कर्तव्य असतं. पण, त्याच्या कुटुंबाची, कल्याण करण्याची जबाबदारी ही नागरिकांनी स्वीकारली पाहिजे. त्या भूमिकेवरच सैनिक पुढे लढत असतात. नमक, नाम आणि निशाण यावर सैनिक आपले जीवन व्यतित करीत असतात. देश आपल्या पाठीमागे आहे, ही भावना घेऊन तो लढायला जातो. सैनिक जनतेच्या सद्भावनेमधून त्याला शक्ती येत असते. राजकीय नेतृत्त्व, नोकरशाही, सैनिक, नागरिक, उद्योग, उद्योजक, राजकीय पक्ष या प्रत्येकांमध्ये एकमेकांबद्दलचा आदर असला पाहिजे. त्याचबरोबर एकमेकांची सीमा काय हे माहिती असली पाहिजे, तरचं त्याला समन्वय म्हटले जाते.
जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी प्रविंद्र बिरादर प्रास्ताविकात म्हणाले, ‘ज्यांनी सांभाळली सीमेची जबाबदारी, त्यांचं कुटुंब आपली जबाबदारी !’ सशस्त्र ध्वज दिन निधीमध्ये सढळ हाताने मदत करा आणि सैनिकांच्या कुटुंबाचा भाग बना, असे आवाहन त्यांनी केले. श्री. गलांडे, श्री. चतुर यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले.
3 लाख 5 हजार निधी संकलन करणाऱ्या सहाय्यक आयुक्त दीनानाथ शिंदे यांचा सन्मान
जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाकडून अन्न व औषध प्रशासनाला 30 हजाराचे उद्दिष्ट देण्यात आले होते. तत्कालीन सहाय्यक आयुक्त दीनानाथ शिंदे यांनी जिल्हा सैनिक कल्याण विभागाच्या कार्याची माहिती घेतल्यानंतर 3 लाख 5 हजार इतका सर्वाधिक निधी गोळा करुन तो सुपूर्द केला. त्याबद्दल खास जळगाववरुन त्यांना निमंत्रित करुन त्यांचा आज सन्मान करण्यात आला.
निवृत नाईक श्री. थत्ते यांनी दोन फूड वार्मर आणि एक संगणक दिला. त्याबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला. वीरपिता कृष्णा पाटील, वीरपत्नी सुरेखा शिंदे, वीर पत्नी रविता कदम, वीरपत्नी अनुजा ठगले, सेना मेडल प्राप्त नाईक बजरंग मोरे, आयआयएम परीक्षेत उत्कृष्ट कामगिरी करणारे आदित्य मोरे, 12 वी परिक्षेत उत्कृष्ट कामगिरी करणारी नेहा शेट्ये, 10 वी मधील श्रावणी सावंत, आंचल भडकमकर यांचाही यावेळी सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला अमर जवान स्मृतीला पुष्पचक्र वाहण्यात आले. शहीद जवानांना आदरांजली वाहिली. त्याचबरोबर दीप प्रज्ज्वलन करण्यात आले. शिर्के हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी स्वागत गीत म्हटले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पूर्वा पेठे यांनी तर सहाय्यक जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी विद्याधर ताटे यांनी केले. कार्यक्रमाला विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी, आजी माजी सैनिक, त्यांचे कुटुंबिय उपस्थित होते.
000



