
गुहागर समुद्र किनाऱ्यावर वाहन नेण्यास सक्त मनाई असतानाही कोल्हापूर येथील पर्यटकांनी स्कॉर्पिओ वाहन थेट वाळूत घातल्याने ते भरतीच्या पाण्यात रुतले
गुहागर समुद्र किनाऱ्यावर वाहन नेण्यास सक्त मनाई असतानाही कोल्हापूर येथील पर्यटकांनी स्कॉर्पिओ वाहन थेट वाळूत घातल्याने ते भरतीच्या पाण्यात रुतले आणि भरतीमुळे वाहन काही वेळातच समुद्रात फसले. जवळपास दोन तासांच्या अथक प्रयत्नानंतर स्कॉर्पिओ पाण्याबाहेर काढण्यात पोलीस व ग्रामस्थांना यश आले. या घटनेत वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
गेल्या आठवड्यात सलग सुट्ट्या आल्यामुळे पर्यटक मोठ्या संख्येने रत्नागिरीत आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील सर्वच समुद्र किनाऱ्यांवर पर्यटकांची गर्दी दिसत आहे. पर्यटकांना समुद्राचे फोटो काढण्याचा मोह आवरला नाही. अती उत्साहाच्या भरात त्यांनी फोटो काढण्यासाठी स्कॉर्पिओ गाडी वाळूमध्ये उतरली होती; मात्र भरती अहोटीचा अंदाज नसल्याने फोटो काढण्याच्या नादात भरतीचे पाणी केव्हा चढले हे त्यांना समजले नाही. त्यामुळे गाडी पाण्यात गाडी पूर्णतः बुडाली.
सुरुवातीला भरती ओसरल्यानंतर वाहन काढता येईल या अपेक्षेने तरुणांनी रात्री नऊ वाजेपर्यंत थांबण्याचा प्रयत्न केला; मात्र पाण्याची पातळी अधिक वाढू लागल्याने अखेर त्यांनी आपत्कालीन मदत क्रमांक ११२ वर संपर्क साधला. ९.३० वाजण्याच्या सुमारास गुहागर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. जेसीबीच्या मदतीने तसेच स्थानिक ग्रामस्थांच्या सहकार्याने स्कॉर्पिओ पाण्याबाहेर काढून सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आली. या सर्व प्रकारात वाहनाचे मोठे नुकसान आहे.
दरम्यान, जिल्ह्यातील सर्वच समुद्रकिनाऱ्यांवर वाहन घेऊन जाण्यास मज्जाव केला आहे. रत्नागिरी जिल्हा पोलीस दलातर्फे वाहन समुद्रकिनारी नेता येऊ नये यासाठी विशेष मोहीम हाती घेऊन वाहनांसाठी वाट बंद करत वाहनांना प्रवेश बंद केला होता. तसेच सावध करणारे सूचना फलक लावण्यात आले आहेत; मात्र वारंवार सूचना देऊनही काही अतिउत्साही पर्यटकांमुळे अशा घटना घडत आहेत. यामुळे पर्यटकांनी समुद्र किनारी पर्यटनाचा आनंद लुटताना काही गोष्टींचे भान बाळगणे आणि योग्य ती खबरदारी घेणे आवश्यक आहे.




