
कै. दिलीप श्रीपाद टिकेकर स्मृती बुद्धिबळ स्पर्धेत सौरिश कशेळकर विजेता
रत्नागिरी : येथे मॅजिक स्क्वेअर चेस अकॅडमीतर्फे आयोजित केलेल्या कै. दिलीप टिकेकर स्मृती जिल्हास्तरीय जलद व अतिजलद या दोनही स्पर्धांचे विजेतेपद रत्नागिरीच्या सौरिश कशेळकर याने पटकावले.
जलद स्पर्धेतील अतिशय अटीतटीच्या अंतिम फेरीत सोहम रूमडे विरुद्ध खेळताना मोक्याच्या क्षणी सोहमने केलेल्या चुकीचा फायदा उठवत सौरिशने डाव बरोबरीत सोडवला. दुसऱ्या एका महत्त्वाच्या अंतिम फेरीतील रंगलेल्या डावात वरद पेठे याने प्रवीण सावर्डेकर विरुद्ध विजय प्राप्त केला. सौरिश व वरद दोघांचेही ७ फेऱ्यांअखेर ६ गुण झाले पण सरस टाय ब्रेक गुणांवर सौरिश विजेता ठरला, तर वरदला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. तेजस्वर कांबळे, श्रीहास नारकर व सोहम रुमडे यांनी प्रत्येकी ५.५ गुणांसह अनुक्रमे तिसरा, चौथा व पाचवा क्रमांक पटकावला. चिपळूणच्या साहस नारकर व प्रवीण सावर्डेकर यांनी प्रत्येकी ५ गुणांसह अनुक्रमे सहावा व सातवा क्रमांक प्राप्त केला. आयुष रायकर, आर्या करकरे, सुहास कामतेकर, लवेश पावसकर, आर्या पळसुलेदेसाई, अलिक गांगुली, अथर्व साठे, विहंग सावंत व शर्वील शहाणे यांनी जलद स्पर्धेतील विविध गटांची उत्तेजनार्थ पारितोषिके प्राप्त केली.
अतिजलद स्पर्धा आठ फेऱ्यांमध्ये घेण्यात आली. अंतिम फेरीतील सामन्यात यश गोगटेने साहस नारकर विरुद्धचा डाव बरोबरीत सोडवला. दुसऱ्या पटावरील अतिशय उत्कंठावर्धक डावात साईप्रसाद साळवी याने सौरिश विरुद्धचा जिंकत आलेला डाव घड्याळातील वेळेच्या दबावाखाली गमावला. याचा फायदा उठवत सौरिशने गुणांमध्ये यशला गाठले व सरस टायब्रेकच्या आधारावर अतिजलद स्पर्धेचेही विजेतेपद प्राप्त केले, तर यश उपविजेता ठरला. वरद पेठे, साहस नारकर, सोहम रुमडे यांनी प्रत्येक ६ गुणांसह तिसरा ते पाचवा क्रमांक पटकावला. आर्यन धुळप १५ वर्षे, आयुष रायकर १२ वर्षे, तर शर्वील शहाणे ९ वर्षे वयोगटांत प्रथम आले.
स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ श्रीमती शरयू दिलीप टिकेकर यांचे हस्ते संपन्न झाला. या प्रसंगी निखिल टिकेकर , प्रा. मंगेश मोडक , चैतन्य भिडे आदी मान्यवर उपस्थित होते. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी विक्रांत फडके यांचे विशेष सहकार्य लाभले. विवेक सोहनी यांनी प्रमुख पंचांची कामगिरी पार पाडली.




