
सर्वोच्च न्यायालयाचा आदेश! सर्व निवडणुका 31 जानेवारीपूर्वी घ्या!!
महाराष्ट्रातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक प्रक्रिया 31 जानेवारी 2026पर्यंत संपवावीच लागेल. त्यामुळे सर्व महापालिका, जिल्हा परिषद निवडणुका 31 जानेवारीपूर्वी घ्या. यात बदल होणार नाही.कोणतेही कारण पुढे करून निवडणुका पुढे ढकलता येणार नाहीत, असे स्पष्ट आदेश सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला दिले. तसेच नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांचे निकाल 21 डिसेंबरलाच जाहीर होतील, असेही न्यायालयाने स्पष्ट केले.
सरन्यायाधीश सूर्य कांत आणि न्या. जॉयमाल्या बागची यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी झाली. 20 डिसेंबरला होणारे मतदान काही कारणास्तव पुढे ढकलले गेल्यास निवडणुकीचा नियोजित कार्यक्रम प्रभावित होईल. त्यामुळे 2 डिसेंबरला झालेल्या निवडणुकीचा निकाल 21 डिसेंबरलाच जाहीर करा. या तारखेत बदल करू नका, असे स्पष्ट आदेश खंडपीठाने आयोगाला दिले. स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक प्रक्रिया 31 जानेवारी 2026 पर्यंत संपवा, असे आदेश न्यायालयाने दिले आहेत. या मुदतीत बदल करू नका, असेही न्यायालयाने सुनावणीत आयोगाला बजावून सांगितले.




